खून करून पहाटे आफताब तीनवेळा घराबाहेर गेला; श्रद्धा खून प्रकरणात मिळाले नवे फुटेज | पुढारी

खून करून पहाटे आफताब तीनवेळा घराबाहेर गेला; श्रद्धा खून प्रकरणात मिळाले नवे फुटेज

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी 15 जिल्ह्यांतील 175 पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, 18 मे रोजी खून केल्यानंतर पहाटेच्या सुमारास बॅग घेऊन जातानाचे आफताबचे एकूण तीन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.

आफताब पूनावालाने केलेल्या श्रद्धाच्या क्रूर हत्येने देशभर संतापाची लाट उसळली असून, आफताबच्या विरोधात पक्के पुरावे गोळा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. अद्याप अवयवाचे सगळे तुकडे हस्तगत झालेले नाहीत व हत्यारही सापडलेले नाही. त्यामुळे पोलिसांना जंग जंग पछाडावे लागत आहे. श्रद्धाचा खून झाल्यानंतर आफताब काहीवेळा दिल्लीबाहेर जाऊन आला. त्यामुळे आता 15 जिल्ह्यांत 175 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. छतरपूर-महरोली हे पोलिसांच्या तपासाचे केंद्र बनले आहे. प्रत्येक धागा तपासला जात आहे. शुक्रवारी पोलिसांच्या हाती तीन महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले. 18 मे म्हणजे श्रद्धाच्या हत्येच्या दिवशीच पहाटे तीनवेळा तो घरातून बॅग घेऊन बाहेर पडल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास पाठीवर काळी सॅक आणि खांद्यावर निळे पुडके घेतलेला आफताब बाहेर जाताना त्या फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्याकडील सॅक व हातातील पुडक्यात श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.

मुंबईतून दिल्लीला येण्याआधी आफताब आणि श्रद्धा अनेक शहरांत फिरले. त्या सर्व ठिकाणी पोलिस तपासाला लागले आहेत. त्याशिवाय श्रद्धाचे मित्र, कार्यालयातील सहकार्‍यांसोबतचे व्हॉटस्अ‍ॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले असून, त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तसेच चेहर्‍यावर मारहाणीच्या खुणा असलेला तिचा फोटोही हाती लागला आहे. 24 नोव्हेंबर 2020 रोजी तिने ऑफिस मॅनेजर करणला व्हॉटस्अ‍ॅपवर आफताबने मारहाण केल्याने आपल्याला चालता येणेही अवघड असल्याचे सांगत कामावर येणार नसल्याचे कळवले होते. सोबत चेहर्‍यावर जखमांच्या खुणा असलेला फोटोही पाठवला होता.

आफताबचे आई-वडील गायब

श्रद्धा खून प्रकरण उजेडात आल्यापासून आफताब पूनावालाचे आई-वडील बेपत्ता झालेले आहेत. त्यांच्या घराला कुलूप आहे. वसईहून पूनावाला कुटुंब मीरा रोडला स्थलांतरित झाले होते. तेथे एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन ते राहत होते. ज्या दिवशी श्रद्धाच्या खुनाची बातमी आली, त्या दिवसापासून अमीन पूनावाला व मुनीरा पूनावाला घराला कुलूप लावून निघून गेले. पोलिस आणि पत्रकार वारंवार चकरा मारत असून, त्यांना कुलूप बघूनच परत जावे लागत आहे.

Back to top button