Men Barking Like Dog : प्रशासकीय अधिकाऱ्यावर भुंकून व्यक्त केला संताप; रेशन कार्डवरचे नाव चुकवल्याचा राग (Video) | पुढारी

Men Barking Like Dog : प्रशासकीय अधिकाऱ्यावर भुंकून व्यक्त केला संताप; रेशन कार्डवरचे नाव चुकवल्याचा राग (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील एक व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्थानिक गट विकास अधिकाऱ्यावर भुंकत असल्याचे दिसून आले. रेशन कार्डवरील नाव बदलण्याचा सरकारचा भोंगळ कारभार समोर आल्यानंतरची ही घटना आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात ही व्यक्ती संताप व्यक्त करत आहे. मात्र संताप व्यक्त करण्याची या व्यक्तीची ही पद्धत थोडीशी वेगळी असलेली पहायला मिळते. हा संताप भुंकण्याच्या स्वरुपात व्यक्त होण्यामागे देखील मोठे कारण आहे. Men Barking Like Dog

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला हा व्हिडिओ ४५-सेकंदाचा आहे. यामध्ये एक माणूस प्रशासकीय अधिकाऱ्यावर कुत्र्यासारखा जोरात भुंकताना आढळून आला. याचे कारण असे आहे की, या माणसाच्या रेशनकार्डवरील नावात ‘दत्ता’ याऐवजी ‘कुत्ता’ असा बदल करण्यात आलेला आहे. या चुकीच्या नावामुळे अधिकाऱ्यावर भुंकत संबंधित व्यक्ती संताप व्यक्त करत असल्याचे समजते. Men Barking Like Dog

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, पीडित व्यक्तीचे नाव श्रीकांती दत्ता असे आहे. श्रीकांती यांनी शिधापत्रिकेतील आडनाव दुरुस्त करण्यासाठी तीनदा अर्ज केला होता. बांकुरा प्रशासनाकडे मदत मागितली परंतु प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्रीकांती हे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणतात की, “मी ज्यावेळी तिसर्‍यांदा माझ्या अडनावात बदल करण्याची मागणी केली, त्यावेळी  ”श्रीकांती दत्ता” ऐवजी ”श्रीकांती कुत्ता” असा चुकीचा बदल करण्यात आला आहे. यामुळे मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो आहे.”

पीडित व्यक्तीने रेशन कार्डवरील नावात बदल करण्याकरिता आवश्यक ती कागदपत्रे सरकारी अधिकाऱ्याला दिली होती. ज्या अधिकाऱ्याला ही कागदपत्रे दिली ते अधिकारी कारमध्ये बसलेले आहेत. पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पँट घातलेले श्रीकांत संपूर्ण व्हिडिओमध्ये एकही शब्द उच्चारताना आढळून आले नाहीत. ते कारच्या खिडकीजवळ उभे राहीलेले आहेत आणि बीडीओ अधिकाऱ्याला कागदपत्रे दाखवत आहेत. मात्र हे प्रशासकीय अधिकारी ती कागदपत्रे दुसर्‍या व्यक्तीकडे सोपवतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. यानंतर श्रीकांत यांचा पारा चढतो आणि रागाच्या भरात ते थेट त्यांच्यावर भुंकायला सुरुवात करतात.

हेही वाचा

Back to top button