‘इन्स्टाग्राम’ पोस्ट भोवली; गुजरातेत आयएएस अधिकार्‍याची उचलबांगडी | पुढारी

‘इन्स्टाग्राम’ पोस्ट भोवली; गुजरातेत आयएएस अधिकार्‍याची उचलबांगडी

अहमदाबाद : अहमदाबादेतील बापूनगर आणि असरवा या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक तैनातीवर असताना ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट टाकणे सिंह यांना महागात पडले. निवडणूक निरीक्षकपदाचा वापर सिंह यांनी ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणून केल्याचा ठपका निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ठेवला आहे.

डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सिंह हे उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. इन्स्टाग्रामवरील फोटोमध्ये ते निरीक्षकाच्या सरकारी वाहनाच्या बाजूला ऐटीत उभे आहेत. ‘निवडणूक निरीक्षक म्हणून रुजू,’ अशी ओळही त्यांनी या फोटोला घातली आहे. दुसर्‍या एका फोटोत तीन अन्य अधिकारी आणि सुरक्षा दलाच्या जवानासह सिंह उभे आहेत. वाहनासह सिंह यांना पुरवण्यात आलेल्या सर्व सरकारी सुविधा आयोगाकडून काढून घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी आता आयएएस कृष्णन वाजपेयी या मतदारसंघांमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून काम बघतील.

Back to top button