हिंदू युवतीचा मारेकरी-पोलिस यांच्यात चकमक; आरोपी जखमी | पुढारी

हिंदू युवतीचा मारेकरी-पोलिस यांच्यात चकमक; आरोपी जखमी

लखनौ; वृत्तसंस्था : धर्मांतराला नकार दिल्याने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकून तिचा खून करणार्‍या सुफियानच्या एका एन्काऊंटरअंती पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुफियानच्या पायाला गोळी लागली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळीच पोलिसांनी सुफियानवर 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

सुफियान व त्याचे कुटुंब घटना घडल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून फरार होते. सुफियान हा दुबग्गातच दडून असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. काकोरीचे सहायक पोलिस आयुक्त डी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तो दडून असलेल्या परिसराला घेराव घातला. बिथरलेल्या सुफियानने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जायबंदी झाला. सुफियानचे पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे.

तक्रारीनुसार, दुबग्गातीलच निधी गुप्ता (वय 19) व सुफियानमध्ये प्रेमसंबंध होते. निधीने इस्लाम कबूल करावा म्हणून सुफियान हट्टाला पेटला होता. तिच्या नकाराने चिडलेल्या सुफियानने तिला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने जबर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. निधीच्या वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

Back to top button