श्रद्धा वालकर खून प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट होणार

श्रद्धा वालकर खून प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट होणार
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पालघर जिल्ह्यातील वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात न्यायालयाने आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, श्रद्धाच्या फोनवरून आफताबने मेहरोली येथे खून केल्यानंतर तिच्या खात्यातून 54 हजार रुपये आपल्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. त्यावेळचे लोकेशन आफताब राहत असलेल्या मेहरोली भागाचेच असल्याचे उघड होताच आफताबचे भांडे फुटले.

श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर आफताब पूनावाला याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्याने केलेले ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावरील चॅटमधील तपशील तसेच काही विसंगत असलेली माहिती याबाबत तपासणी करायची असल्याने आफताबची नार्को टेस्ट करू द्यावी, अशी विनंती पोलिसांनी साकेत कोर्टासमोर केली. न्यायालयाने त्याला मंजुरी दिली.

दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या मोबाईलबाबत आफताबने दिलेल्या विसंगत माहितीतून सार्‍या प्रकाराचा भंडाफोड झाला. 18 मे रोजी श्रद्धाचा खून झाल्यानंतर आणि एकेक करीत तिच्या शरीराचे तुकडे फेकून दिल्यानंतर आफताब निर्धास्त झाला. ऑक्टोबर महिन्यात तिच्या वडिलांनी पोलिसांना, आफताबची चौकशी केली तेव्हा त्याने 22 मे रोजी श्रद्धा भांडण झाल्यानंतर रागारागात घर सोडून गेली. जाताना तिने फक्त मोबाईल सोबत ठेवला, तिचे कपडे व इतर सामान घरीच आहे, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचे ट्रॅकिंग सुरू केले. कॉल्सचा तपशील आणि लोकेशन्स तपासले. त्यात 22 आणि 26 मे रोजी श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपये आफताबच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे समोर आले. यावेळी बँकेच्या अ‍ॅपवर फोनचे नोंदले गेलेले लोकेशन मेहरोलीचेच होते. शिवाय, श्रद्धाच्या इन्स्टाग्रामवरील चॅटची झाडाझडती घेतली असता, त्यावेळीही लोकेशन मेहरोलीचेच होते. यामुळे संशय बळावल्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. 18 मे रोजी श्रद्धा निघून गेल्यावर मेहरोलीतूनच तिने पैसे कसे खात्यात जमा केले, असे विचारताच आफताबला आपले भांडे फुटल्याचे समजले आणि तो रडू लागला. नंतर त्याने सगळा कबुलीजबाब दिला, असे पोलिसांनी सांगितले.

आधीच खून करणार होता

मला कुणाचे फोन आले आणि मी जास्त वेळ बोललो की, श्रद्धाला संशय यायचा आणि भांडायची. 18 तारखेच्या आधीच तिचा खून करणार होतो; पण आमचे भांडण झाल्यावर ती रडायला लागली; मग मी प्लॅन रद्द केला, असेही आफताबने जबाबात म्हटले आहे.

शिरवगळता 13 तुकड्यांचे अवशेष सापडले

दरम्यान, आफताबच्या जबाबानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या शरीराचे अवयव शोधण्याचे काम हाती घेतले. आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराच्या 13 तुकड्यांचे अवशेष पोलिसांनी हस्तगत केले. त्यांची 'डीएनए' चाचणी केली जाणार आहे. मात्र, श्रद्धाचे शिर अद्याप हाती लागलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news