'आप' हिंदूविरोधी पक्ष; दिल्लीत भाजपचा पोस्टरमधून निशाणा | पुढारी

'आप' हिंदूविरोधी पक्ष; दिल्लीत भाजपचा पोस्टरमधून निशाणा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. २५० जागांसाठी ४ डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, दिल्लीत निवडणुकीबाबत पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. भाजप सतत पोस्टरच्या माध्यमातून आम आदमी पार्टीवर निशाणा साधत आहे. एका पोस्टरद्वारे भाजपने आपला हिंदूविरोधी पक्ष म्हणून संबोधले आहे.

‘आप’वर हल्लाबोल करत भाजपने लिहिले की, सत्तेच्या नशेत केजरीवाल आणि कंपनी कट्टर हिंदुद्वेषी झाले आहेत. यामध्ये भाजपने हिंदू निर्गमन, शाहीन बाग, खलिस्तान, धर्मांतर, दिल्ली दंगल आदी मुद्दे उपस्थित केले आहेत.

याशिवाय दिल्ली सरकारच्या कारभारावरही भाजपने निशाणा साधला आहे. दारू घोटाळा, तिहार वसुली, दिल्ली जल बोर्ड घोटाळा, शिक्षण घोटाळा, मनी लाँड्रिंग आणि वक्फ घोटाळा यावरून भाजपने केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी दिल्ली भाजपचे प्रमुख आदेश गुप्ता यांनी मनीष सिसोदिया यांचा एक कार्टून फोटो शेअर करत ‘महाठग केजरीवालचा लुटारू’ असे लिहिले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button