गुजरातेतील राज समाधियालाची बातच न्यारी; प्रचाराला बंदी, मतदान मात्र 100 टक्के! | पुढारी

गुजरातेतील राज समाधियालाची बातच न्यारी; प्रचाराला बंदी, मतदान मात्र 100 टक्के!

राजकोट; वृत्तसंस्था :  ग्रामीण भागात राजकारण किती जिव्हाळ्याचा विषय असतो, हे सर्वश्रुत आहे. निवडणूक आली की, पारावर रंगणारा गप्पांचा फड, त्यात आबालवृद्धांचा सहभाग, असे चित्र गावागावांत आजही दिसून येते. गुजरातमधील एक गाव मात्र याला अपवाद ठरले आहे. तेथे कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचारास बंदी आहे. इतकेच नव्हे, तर 1979 पासून गावात सरपंचपदाची निवडणूकही झालेली नाही, हे उल्लेखनीय.

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असलेल्या गुजरातमधील राज समाधियाला या गावाने देशात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या वेगळेपणासाठी ते सातत्याने चर्चेत येत असते. विशेष म्हणजे, राजकीय पक्षांना या गावात प्रचार करण्यास मनाई असली, तरी येथील सुमारे 900 मतदार इतके जागरूक आहेत की, 2014 पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकांत येथे 100 टक्के मतदान झाले आहे. तसा नियमच गावात केला असून, मतदान चुकविल्यास संबंधिताला दंड ठोठावला जातो. ही रक्कम गावच्या विकासासाठीच खर्च होते.
दुसरी बाब म्हणजे, परस्पर सहमतीने गावचा सरपंच निवडला जातो. गेल्या 50 वर्षांपासून हे पद हरदेवसिंह जडेजा यांच्याकडे आहे, पूर्ण गाव त्यांचे म्हणणे ऐकते. गावातील तंटे स्थानिक पातळीवर मिटविले जातात. त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागत नाही. ही प्रक्रिया पारदर्शी असल्याने आसपासच्या पाच-सहा गावांतील लोकही आपले तंटे घेऊन या ठिकाणी येतात, हेही या गावाचे एक वैशिष्ट्यच.

शहराप्रमाणे सोयीसविधा उपलब्ध

गावात शाळा, कॉलेजसह खेळाचे मैदान, पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. त्यामुळे गावातील मुलांना शिक्षणासाठी शहराकडे जावे लागत नाही. त्यांना ने-आण करण्यासाठी बसेसही आहेत. या गावातील रस्ते, घरे, सार्वजनिक ठिकाणी असणारी स्वच्छता पाहून कोणाचेही डोळे दीपतील. जलव्यवस्थापन असे आहे की, प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचते.

Back to top button