Rajiv Gandhi assassination case | राजीव गांधींच्या हत्येतील दोषी नलिनी, पी रविचंद्रन यांची तुरुंगातून सुटका | पुढारी

Rajiv Gandhi assassination case | राजीव गांधींच्या हत्येतील दोषी नलिनी, पी रविचंद्रन यांची तुरुंगातून सुटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांच्यासह ६ दोषींची तुरुंगातून सुटका करण्याचे निर्देश आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने त्यांचे वर्तन समाधानकारक असल्याचे लक्षात घेऊन मुदतपूर्व सुटकेची मागणी करणाऱ्या त्यांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. दरम्यान, मे महिन्यात मद्रास हायकोर्टाने यांच्या सुटकेची याचिका फेटाळून लावली होती.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्वाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपीची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहर, रॉबर्ट पेस, रविचंद्रन, राजा, श्रीहरन तसेच जयकुमार यांना मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तामिळनाडू सरकारने यापूर्वीच सर्व दोषींची मुक्तता करण्याची शिफारस केली होती. पंरतु, राज्यपालांकडून योग्य कारवाई करण्यात आली नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठाने नोंदवले. मे महिन्यात याप्रकरणातील एक दोषी पेरारीवलन ला सर्वोच्च न्यायालयाने मुक्त करण्याचे आदेश दिले होते.

दोषींनी तीन दशकांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे.तुरूंगातील त्यांचे वर्तन समाधानकारक आहे.तुरूंगात असतांना दोषींनी विविध पदव्या मिळवल्याचे देखील सर्वोच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. हत्याकांडातील दोषी नलिनीने शिक्षाकाळापूर्वी मुक्तता करण्याची मागणी करीत ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.तात्काळ मुक्ततेची तिची याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली होती.याला नलिनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

तामिळनाडू सरकारने ९ सप्टेंबर २०१८ मध्ये हत्याकांडातील दोषींची मुक्तता करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस दोषींनी माफी यचिका दाखल केलेल्या राज्यपालांसाठी बंधकारक असेल,असे न्यायालयाने निर्देश देतांना स्पष्ट केले. घटनेतील कलम १४२ अंतर्गत अनन्यसाधारण अधिकाराचा वापर करीत सर्वोच्च न्यायालयाने १८ मे २०२२ ला पेरारिवलन याची मुक्तता करण्याचे आदेश दिले होते.त्याने ३० वर्षांहून अधिक काळ शिक्षा भोगली होती. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर मध्ये एका महिलेच्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात ४१ लोकांना आरोपी बनवण्यात आले होती. यातील १२ आरोपींचा मृत्यू झाला आहे तर तीघे फरार झाले होते. उर्वरित २६ जणांना अटक करण्यात आली होती. यात श्रीलंका तसेच भारतीय नागरिकांचा समावेश होता.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button