राजीव गांधी यांचे अपूर्ण कार्य राहुल पूर्ण करणार : रॉबर्ट वाड्रा | पुढारी

राजीव गांधी यांचे अपूर्ण कार्य राहुल पूर्ण करणार : रॉबर्ट वाड्रा

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या तांत्रिक विकासाला स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात चालना मिळाली होती. तशीच विकासाला गती देण्याचे काम राहुल गांधी करणार आहेत, असा ठाम विश्वास प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी शिर्डीत व्यक्त केला.
उद्योगपती रॉबर्ट वाड्रा हे रविवारी (दि.30) शिर्डीत श्रीसाई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. श्रीसाईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीसाई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, सुमित शेळके, सचिन चौगुले, अमृत गायके, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

रॉबर्ट वाड्रा म्हणाले, शिर्डीचे श्रीसाई बाबा व राहुल गांधी यांचे विचार सारखेच वाटतात. बाबा लोक समूहात राहत होते, तसेच राहुल गांधी देखील सामान्य जनतेत राहतात. जनता त्यांच्यासोबत जोडली जात आहे, असे सांगत देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत. राहुल गांधी ते सोडवून बदल घडवून आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अलिकडे पंतप्रधान काही बोलायला लागले की, लोकांना भिती वाटायला लागते. आता ते कोणत्या अडचणी जनतेसमोर उभ्या करतात, अशी भिती वाटते, असे मत रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केले.

 
सरकारच्या अपयशाबद्दल जे बोलतात, जे जनतेत जातात, त्यांना विरोधी लोक ट्रोल करतात. त्यांना चुकीचे कसे आहे, असे विचारतात. त्यामुळे राहुल गांधी व आम्ही आता थांबणार नाही. जनतेसाठी एकजूट होऊन काम करू, असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले.

Back to top button