Tamil Nadu Rain : तमिळनाडूत पावसाचा कहर; रेड अलर्ट जारी, शाळांना सुट्टी | पुढारी

Tamil Nadu Rain : तमिळनाडूत पावसाचा कहर; रेड अलर्ट जारी, शाळांना सुट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. हवामान विभागाने शुक्रवारी (दि.११) तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि राणीपेट जिल्ह्यांसाठी तर, शनिवारी (दि.१२) दिंडीगुल, थेनी आणि निलिगिरीस जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने सुरक्षतेच्या कारणास्तव तमिळनाडूतील काही जिल्ह्यांमधील शाळांना आणि महाविद्यालयांनी शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे.

तिरुवल्लूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती तिरुवल्लूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी ट्विट करत दिली आहे. मुसळधार पावसामुळे पुद्दुचेरीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्रही समोर आले आहे. दरम्यान राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी देखील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. अहवालानुसार, कांचीपुरम आणि मदुराई जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये दोन्ही बंद राहतील, तथापि, फक्त शिवगंगा आणि दिंडीगुल जिल्ह्यात शाळा बंद राहतील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या टंकलेखन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा 19 आणि 20 नोव्हेंबरला होणार आहेत.

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्रात पुढील २४ तासांत कमी दाबाचा प्रभाव हा अधिक तीव्र होणार असल्याने तमिळनाडूसह दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Back to top button