मुंबईत राष्ट्रीय आमदार परिषदेचे आयोजन | पुढारी

मुंबईत राष्ट्रीय आमदार परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षाच्या जून महिन्यात मुंबई येथे राष्ट्रीय आमदार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सोमवारी या परिषदेची रूपरेषा निश्चित करण्याबाबतच्या चर्चासत्रात देण्यात आली. देशातली ही अशा प्रकारची पहिली परिषद ठरणार आहे. देशातल्या विधान मंडळाच्या कामकाजाची ताकत वाढविणे, त्यांची व्यवस्था मजबूत करणे आणि सुशासनाला प्राधान्य देणे हा परिषदेचा उद्देश असल्याचे लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी यावेळी सांगितले. विविध पक्षांचे आमदार एका मंचावर येऊन राजकीय मतभेद विसरत चांगले वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. परिषदेची रुपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये राउंड टेबल चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सुमित्रा महाजन यांच्याबरोबरच लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, माजी अध्यक्षा मीरा कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वरील तिन्ही नेते मुंबईत होणाऱ्या परिषदेचे संरक्षक आहेत. आगामी परिषदेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी राउंड टेबल चर्चासत्रात आपली बाजू मांडली. आगामी परिषद लोकशाही मजबूत करण्याच्या संदर्भात महत्त्वाची कामगिरी बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफार्म” चा मंत्र साकार करण्याचे काम ही परिषद करेल, असे या नेत्यांनी सांगितले. परिषदेत 15 पेक्षा जास्त राज्यांच्या विधान मंडळाचे सभापती तसेच अध्यक्ष सहभाग घेणार असून त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, हरियाणा आदी राज्यांतील सभापती / अध्यक्षांचा समावेश आहे. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेचे माजी महासचिव, वरिष्ठ सरकारी अधिकारी हेही कुशल प्रशासनाबाबतचे आपले अनुभव व्यक्त करणार आहेत.

अनेक संस्थानी एकत्रतपणे परिषदेचे आयोजन केले आहे. त्यात गैरसरकारी संस्था आणि सामाजिक संघटनांचा समावेश आहे. यात एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा प्रामुख्याने समावेश आहे. कॉमनवेल्थ पार्लमेंट असोसिएशन, इंटर पार्लियामेंट्री युनियन आणि यूनेस्को यांच्याकडून सहयोग मिळण्याची अपेक्षा असल्याचेही चर्चासत्रादरम्यान सांगण्यात आले.

हेही वाचलंत का?

Back to top button