

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी (दि.३) दक्षता जागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय दक्षता आयोगाच्या (CVC) नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलचा शुभारंभ केला. दक्षता जागृती सप्ताह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनापासून सुरु होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण जीवन प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सार्वजनिक सेवेसाठी समर्पित केले. या वचनबद्धतेसोबत दक्षता जागृतीची ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
गेली ८ वर्षापासून आम्ही टंचाई आणि दबावामुळे निर्माण झालेली व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही आधुनिक टेक्नॉलॉजी, मुलभूत सुविधांत सुधारणा आणि आत्मनिर्भरता हे तीन मार्ग निवडले आहेत. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचला जात आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे २ लाख कोटींहून अधिक रक्कम चुकीच्या हातात जाण्यापासून वाचली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
विविध सरकारी विभागांमध्ये जनतेसाठी एक कार्यक्षम तक्रार निवारण प्रणाली आहे. पण जर आपण एक पाऊल पुढे टाकले आणि सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीचे ऑडिट सुनिश्चित केले तर आपण भ्रष्टाचाराच्या अगदी तळापर्यंत पोहोचू शकतो आणि तो मुळापासून उखडून टाकू शकतो, असेही ते म्हणाले. आज आपण संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत आहोत. यामुळे भ्रष्टाचाराला आता जागा नसल्याचे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा :