जय इथेनॉल… होणार ऊस उत्पादक मालामाल! | पुढारी

जय इथेनॉल... होणार ऊस उत्पादक मालामाल!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत (ईबीपी) केंद्र सरकारने इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ केली आहे. थेट उसाच्या रसापासून बनणार्‍या इथेनॉलसाठी आधीच्या 63.45 रुपये दरात 2 रुपये 15 पैसे वाढ करून नवा दर 65.60 रुपये प्रतिलिटर ठरविण्यात आला आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष 2022-23 साठी ही दरवाढ लागू असेल. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीची (सीसीईए) बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. 1 डिसेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 हे इथेनॉल पुरवठा वर्ष मानले जाणार आहे.

पेट्रोलमध्ये मिश्रणाचा रोडमॅप

पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी वर्ष 2030 पर्यंतचे लक्ष्य केंद्र सरकारने डोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र, हा कालावधी वर्ष 2025-26 पर्यंत कमी करण्यात आला आहे. त्याद़ृष्टीने इथेनॉल मिश्रणाचा 2020 ते 2025 चा रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे.

इथेनॉल प्रकल्पांना प्रोत्साहन

‘इथेनॉल डिस्टिलेशन’ची वार्षिक क्षमता 923 कोटी लिटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठी केवळ इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून उभारलेल्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या राज्यांत इथेनॉलनिर्मितीचे कारखाने नाहीत, अशा ठिकाणी खासगी कंपन्यांना प्रकल्प सुरू करण्यासाठी सवलती दिल्या जात आहेत. पुढील काही वर्षांत या राज्यांमध्ये 25 ते 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

Back to top button