चीन-पाकिस्तानविरुद्ध सीमेवर 75 सुरक्षा कवच | पुढारी

चीन-पाकिस्तानविरुद्ध सीमेवर 75 सुरक्षा कवच

लेह (लडाख); वृत्तसंस्था : ‘सीमा रस्ते संघटने’च्या (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) माध्यमातून ‘एलएसी’वर 75 विविध योजनांचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या योजनांमुळे चीन आणि पाकिस्तानच्या कटकारस्थानांवर पाणी फिरणार आहे. या योजना देशासाठी सुरक्षा कवच म्हणून उपयुक्त ठरतील.

चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या देशाच्या सीमेवर 75 नव्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण राजनाथ सिंह यांच्या लेह लडाख दौर्‍यादरम्यान झाले. चीन एलएसी आणि पीओके (व्याप्त काश्मीर) लगत सातत्याने रस्त्यांचे जाळे निर्माण करतो आहे. भारत त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्व हवामानांत कार्यरत राहातील, असे रस्ते मोठ्या प्रमाणावर तयार करत आहे. 2023 पर्यंत उत्तर सीमेवर भारताचे 272 रस्ते तयार झालेले असतील.

सर्वाधिक12 पूल काश्मीरमध्ये, 7 लडाख, 3 हिमाचल, 6 उत्तराखंड, 2 सिक्किम आणि 13 अरुणाचल प्रदेशात तयार करण्यात आले आहेत. राजस्थान सीमेवर 6 रस्ते, पंजाबमध्ये 1, जम्मू काश्मीरमध्ये 7, लडाखमध्ये 8, सिक्किममध्ये 2, तर अरुणाचल प्रदेशात 4 रस्ते बनविण्यात आले आहेत. शिवाय लडाखमध्ये 2 हेलिपॅड उभारले आहेत. न्योमातील हेलिपॅड चीनसीमेवरून हाकेच्या अंतरावर आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या 5 वर्षांत 2088.57 किलोमीटर रस्ते बनलेले आहेत.

75 प्रकल्पांत काय काय?

प्रकल्पांत 44 पूल, 28 रस्ते, 2 हेलिपॅडचा समावेश आहे. एक ‘झिरो कार्बन हॅबिटेट’ही त्यात आहे. सर्व रस्ते आणि हेलीपॅड गेल्या 2 वर्षांपासून भारत आणि चीन समोरासमोर असलेल्या भागांत आहेत, हे विशेष!

झिरो कार्बन हॅबिटेट काय?

न्योमालगत हानलेमध्ये एक झिरो कार्बन हॅबिटेट तयार आहे. कडाक्याच्या थंडीत हे ठिकाण सीमेवरील जवानांना आरामदायक निवास उपलब्ध करून देईल. ऑक्सिजनचे प्रमाण येथे भरपूर असेल.

Back to top button