पुढारी ऑनलाइन डेस्क: रेल्वेतील सर्व कामकाज पेपरलेस होणार आहे. १ नोव्हेंबरपासून ऑफलाइन काम पूर्णपणे बंद होणार असून डिजिटल इंडियाकडे वेगाने वाटचाल करत आहे. यासाठी बोर्डाने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून पेपरलेस काम सुरू करण्यासाठी मुदत निश्चित केली आहे. देशात पर्यावरण सुरक्षा व कागदांचा वापर कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात असल्याने रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
आता सर्व माहिती ऑनलाइन
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार, कर्मचार्यांमध्ये केवळ ई-मेल किंवा ई-फायलिंगद्वारे पत्रव्यवहार केला जाईल. पेपरद्वारे कामकाज व पत्रव्यवहार बंद होईल. . तीन वर्षांपूर्वी पेपरलेस कामासाठी करार केला होता, मात्र कोरोनामुळे कामाला गती मिळाली नाही. असे असले तरी रेल्वे रुग्णालये, तिकीट, वाहतूक आदी कामे ऑनलाइन केली जात होती. सध्याच्या काळात मोठ्या स्थानकांमध्येही डिजिटल कामाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले. मात्र छोट्या स्थानकांची बरीच कामे जुन्या पद्धतीनेच केली जात होती.
रेल्वेमध्ये अजूनही 20 टक्के कामे ऑफलाइनच
एका अहवालानुसार, जवळपास 20 टक्के काम अजूनही ऑफलाइन केले जात असल्यामुळे कामात विनाकारण विलंब होतो, खर्चही वाढतो. या अनुषंगाने आता सर्व कामे पेपरलेस व्हावे हे लक्षात घेऊन छोटी स्थानकेही डिजिटल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा, डिजिटायझेशन अँपद्वारे सामान्य वर्गाच्या तिकीटांसोबतच ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.