Hate Speech Case | द्वेषपूर्ण वक्तव्य भोवलं, समाजवादीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना तीन वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा | पुढारी

Hate Speech Case | द्वेषपूर्ण वक्तव्य भोवलं, समाजवादीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना तीन वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा

लखनौ; पुढारी ऑनलाईन : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना रामपूर न्यायालयाने द्वेषपूर्ण विधान प्रकरणी (Hate Speech Case) दोषी ठरवले आहे. त्यांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आझम खान यांनी २०१९ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात द्वेषपूर्ण टिप्पणी केली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.

रामपूरचे आमदार असलेले आझम खान यांच्यावर खंडणी, गुन्हेगारी कट रचणे आणि चोरीसह ९० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्यांना पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटण्यापूर्वी ते २७ महिने तुरुंगात होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तत्कालीन जिल्हाधिकारी औंजनेय कुमार सिंह यांच्या विरोधात प्रक्षोभक टिप्पणी केल्याबद्दल ९ एप्रिल २०१९ रोजी रामपूरमधील मिलककोतवाली येथे खान यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १५३ ए (दोन गटांमधील वैर वाढवणे), ५०५-१ तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

भाजप नेते आकाश सक्सेना यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी त्यांना दोषी ठरवले आहे. आझम खान यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. याआधी या प्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी निकालाची तारीख न्यायालयाने निश्चित केली होती. त्यानंतर आझम खान यांनी लेखी निवेदन देऊन वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर २७ ऑक्टोबर तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आज न्यायालयाने निर्णय दिला.

(Hate Speech Case)

Back to top button