पुढारी ऑनलाईन – प्रेमात लोक वेडी होतात, असे म्हटले जाते. याचाच अनुभव कर्नाटकमधील एका प्रकरणात आलेला आहे. ३० वर्षांच्या एका तरुणाला फेसबुकवर ओळख झालेल्या एका तरुणीने आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करत ४० लाखांना टोपी घातली आहे. विशेष म्हणजे या तरुणाचा पगार महिना ३० हजार रुपये आहे. या तरुणीला देण्यासाठीचे पैसे त्याने वडील आणि मित्रांना थापा मारून जमवले होते. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी येथील या तरुणाचे नाव परमेश्वरम हिप्परगी असे आहे. त्याने फसवणुकीची तक्रार दिली आहे.
हिप्परगी याने २९ जून २०२२ला मंजुळा के. आर. या नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांत चॅटिंगवरून जवळीक वाढली. मंजुळा हिने सुरुवातीला आईच्या उपचारासाठी ७०० रुपये मागितले. ही रक्कम हिप्परगीने फोन पेवरून दिली. त्यानंतर वेळोवेळी मंजुळाने हिप्परगीकडून पैसे घेतले.
या महिलने आपण आयएएसची परीक्षा उत्तिर्ण झालो आहोत, आणि लवकरच हासनमध्ये उपायुक्त म्हणून रुजू होत आहोत, अशी थाप मारली. त्यानंतर आईचे निधन झाले असून धार्मिक विधींसाठी पैसे लागतील, असे सांगून हिप्परगीकडून पैसे घेतले. तसेच पालकांचे कर्ज भागवण्यासाठीचे निमित्त करून तिने हिप्परगीकडून पैसे घेतले.
हिप्परगी एका खासगी कंपनी लेबर सुपरव्हाईजर या पदावर काम करतो. त्याने जवळपास ३२ लाख रुपयांची उधारी केली आहे. लग्नाचे वचन दिल्याने या तरुणीला पैसे दिल्याचे हिप्परगीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतील तरुतुदीनुसार गुन्हा नोंद झाला आहे.
हेही वाचा