Cyclone Sitrang | ‘सितरंग’ चक्रीवादळ उद्या पहाटे धडकणार, ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा | पुढारी

Cyclone Sitrang | 'सितरंग' चक्रीवादळ उद्या पहाटे धडकणार, 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘सितरंग’ चक्रीवादळ (Cyclone Sitrang) गेल्या ६ तासांत १५ किमी प्रतितास वेगाने उत्तर-ईशान्य दिशेला सरकत आहे. पुढील १२ तासांत त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. बांगलादेशातील टिंकोना बेट आणि सँडवीप बेट दरम्यान २५ ऑक्टोबरला पहाटे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

सोमवारी सकाळी हे चक्रीवादळ सागर बेटाच्या दक्षिणेस सुमारे ३८० किमी अंतरावर घोंघावत होते. दरम्यान, या वादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्रिपुरा, आसाम, मिझाराम, मणिपूर आणि नागालँड या राज्यांना देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांत २५ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँडमध्ये २६ ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्रिपुरा सरकारने २६ ऑक्टोबरला सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

उद्या पहाटे हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनाऱ्याला लागून असलेल्या टिंकोना आणि सँडवीप बेट ओलांडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या हे चक्रीवादळ सागर बेटाच्या दक्षिणेस ३८० किमी आणि बारिसालपासून ५२० किलोमीटर अंतरावर घोंघावत आहे. हे चक्रीवादळ २५ ऑक्टोबरच्या पहाटे बांगलादेशची किनारपट्टी पार करणार असल्याने हवामान विभागाने सतर्कचा इशारा दिला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह दक्षिण जिल्ह्यांत सोमवारी सकाळी पाऊस पडला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने हा पाऊस पडला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके अलर्टवर आहेत.

या चक्रीवादळामुळे (Cyclone Sitrang) पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना, उत्तर २४ परगना आणि मिदनापूर सारख्या किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या वादळामुळे प्रतितास ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते. वाऱ्याचा वेग प्रतितास ११० किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो. कोलकाता शहरात प्रतितास ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button