King Virat Kohli : विराटने घडवला अविश्वसनीय, अकल्पित विजय; जाणून घ्या विजयाचा ‘एक्स फॅक्टर’ | पुढारी

King Virat Kohli : विराटने घडवला अविश्वसनीय, अकल्पित विजय; जाणून घ्या विजयाचा ‘एक्स फॅक्टर’

मेलबर्न : वृत्तसंस्था : भारताने अखेर गेल्या वर्ल्डकपमधील दुबईतील पराभवाचे उट्टे मेलबर्नमध्ये लाखभर प्रेक्षकांच्या साक्षीने काढले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेटस् राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरुवात केली. विराट कोहलीने (King Virat Kohli) 53 चेंडूंत 82 धावा केल्या. त्याने हार्दिक पंड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत हातातून गेलेला विजय खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने एकेरी धाव घेत सामना संपवला.

पाकिस्तानच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 4 धावा करून माघारी परतले. नसीम शाहने के.एल. राहुलची तर हॅरिस रौफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.

रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरुवात केली. मात्र 10 चेंडूंत 15 धावा केल्यानंतर हॅरिस रौफच्या वेगाने त्याला चकवले. अक्षर पटेलला बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र, तो 2 धावा करून धावचित झाला. भारताच्या 31 धावांत 4 विकेटस् पडल्यानंतर हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरुवात केली. त्यांनी नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

12 व्या षटकात पारडं फिरलं (King Virat Kohli)

भारताने 11 व्या ओव्हरपर्यंत 4 विकेटस् गमावून 54 धावा केल्या होत्या. भारतीय टीमपेक्षा 11 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तान वरचढ होता. मोहम्मद नवाझच्या 12 व्या षटकामध्ये टीम इंडियाने 20 रन केल्या अन् भारतीयांच्या मनात विजयाचे दीप उजळू लागले. हार्दिक पंड्याने पहिल्या बॉलवर षटकार खेचला, यानंतर पंड्याने एक रन घेतली. पुढे चौथ्या बॉलवर विराट कोहलीने षटकार खेचला. सहाव्या चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार खेचला.

19 वे षटक टाकणार्‍या हॅरिस रौफला सलग दोन षटकार मारत सामना 6 चेंडूंत 16 धावा असा आणला. 20 व्या षटकात हार्दिक पंड्या मोहम्मद नवाझच्या पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. पुढे कार्तिकने एक रन काढून विराटकडे स्ट्राईक दिली. विराटने तिसर्‍या चेंडूवर 2 धावा केल्या. मोहम्मद नवाझने फुलटॉस बॉल टाकला त्यावर विराटने षटकार खेचला. त्यामुळे टीम इंडियाला 3 बॉलवर 6 धावा हव्या होत्या. यानंतर नवाझने वाईड बॉल टाकला. पुढे विराट कोहलीला फ्री हिटच्या चेंडूवर फटका लगावता आला नाही. यावेळी तीन धावा बाईजच्या मिळाल्या. पुढे कार्तिक स्ट्राईकवर आला आणि तो आऊट झाला. पुढे एका बॉलवर दोन धावा अशी गरज असताना अश्विन स्ट्राईकवर आला. मोहम्मद नवाझने वाईड बॉल टाकला. अखेरच्या बॉलवर अश्विनने एकेरी धाव घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून एमसीजीच्या ग्रीन कारपेटवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात फक्त 1 धाव दिली. त्यानंतर दुसर्‍या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमला शून्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था 1 बाद 1 धाव अशी केली. अर्शदीप सिंगने चौथ्या षटकात मोहम्मद रिझवानला देखील 4 धावांवर बाद करत दुसरा मोठा धक्का दिला.

अवघ्या 15 धावांत पाकिस्तानने दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर शान मसूद आणि इफ्तिकार अहमदने पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनी 9 व्या षटकात पाकिस्तानचे अर्धशतक धावफलकावर लावले. संथ फलंदाजी करणार्‍या इफ्तिकार अहमदने फिरकी गोलंदाज येताच अचानक गिअर बदलला. त्याने अश्विन आणि अक्षर पटेलला मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. त्याने पटेलच्या एका षटकात तीन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाठोपाठ हार्दिक पंड्याने देखील शादाब खानला 5 धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था 4 बाद 96 अशी केली.

त्यानंतर हैदर अली (2 धावा) आणि मोहम्मद नवाझला (9 धावा) हार्दिक पंड्याने स्वस्तात माघारी धाडत पाकिस्तानची अवस्था 6 बाद 115 धावा अशी केली. हार्दिक पंड्याने 4 षटकांत 30 धावा देत 3 बळी टिपले. त्यानंतर अर्शदीप सिंगने आसिफ अलीला 2 धावांवर बाद करत पाकिस्तानला 7 वा धक्का दिला. दरम्यान, शान मसूदने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 40 चेंडूंत 50 धावा करत शाहिन आफ्रिदीसोबत भागीदारी रचण्यास सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीने स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करत पाकिस्तानला 150 चा टप्पा पार करून दिला.

विजयाचे ‘एक्स फॅक्टर’

विराट कोहली : राहुल बाद झाल्यावर डावाच्या बाराव्या चेेंडूवर मैदानात आला. संघ अडचणीत असताना समोर रोहित शर्मा, अक्षर पटेल बाद झाले. पण पट्ट्याने हार मानली नाही. हार्दिकच्या साथीने त्याने विजयाची इमारत उभी करण्यास सुरुवात केली. हार्दिकने अर्ध्यावर साथ सोडली; परंतु विराटने विजयाचा कळस चढवूनच मैदान सोडले.

हार्दिक पंड्या : आधी गोलंदाजीत तीन विकेटस् घेत पाकिस्तानची मधली फळी कापली. त्यानंतर फलंदाजीत विजयासाठी झुंजणार्‍या विराटच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. तो एका बाजूला असल्यामुळे विराट मनसोक्त फलंदाजी करू शकला. हार्दिकने 40 धावा करताना 2 षटकार ठोकल्याने धावगतीचा दबाव कमी झाला.

अर्शदिप सिंग : आशिया चषकात मोक्याच्या क्षणी झेल सोडून खलनायक बनलेला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपला कलंक धुवून काढला. विश्वचषकातील आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवण्याचे भाग्य त्याला लाभले. त्याने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि असिफ अली यांच्या विकेट घेत पाकिस्तानला चाप लावला.

Back to top button