Mission LVM3 M2: इस्रोचे ‘बाहुबली’ रॉकेट लाँच | पुढारी

Mission LVM3 M2: इस्रोचे ‘बाहुबली’ रॉकेट लाँच

पुढारी ऑनलाईन: ‘इस्रो’तर्फे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) म्हणजेच ‘एलव्ही एमव्हीएम 3 एम 2’ (लाँच व्हेईकल मार्क 3) या बाहुबली रॉकेटमधून तब्बल 36 उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून शनिवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आले. ‘एलव्ही एमव्हीएम 3 एम 2/वनवेब इंडिया 1’ असे या मोहिमेचे नाव होते. मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी हे रॉकेट हवेत झेपावले. हे रॉकेट याआधी जीएसएलव्ही मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होते.‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ आणि ब्रिटनमधील ‘वनवेब’ या स्टार्टअप कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. सर्व उपग्रह कॅप्सूलमध्ये बसविण्यात आलेले होते.

प्रक्षेपित करण्यात आलेले रॉकेट इस्रोचे आतापर्यंतचे सर्वात वजनदार रॉकेट आहे, त्यामुळे त्याला बाहुबली रॉकेट असेही म्हटले जाते. या रॉकेटचा वापर पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपणासाठी करण्यात आला. ‘वनवेब’ ही एक खासगी उपग्रह कंपनी आहे. या प्रक्षेपणासह न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या आपल्या व्यावसायिक शाखेच्या माध्यमातून इस्रोने जागतिक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण बाजारामध्ये पाऊल टाकले आहे. इस्रोने उपग्रहांचे हे प्रक्षेपण लोकांना पाहता यावे म्हणून ‘व्ह्यूइंग गॅलरी’ची सुविधाही उपलब्ध करून दिली होती.

Back to top button