Madhya Pradesh | दिवाळीसाठी घर परतताना काळाचा घाला, मध्य प्रदेशातील भीषण अपघातात १४ ठार, ४० जखमी | पुढारी

Madhya Pradesh | दिवाळीसाठी घर परतताना काळाचा घाला, मध्य प्रदेशातील भीषण अपघातात १४ ठार, ४० जखमी

रेवा (मध्य प्रदेश) : पुढारी ऑनलाईन; मध्य प्रदेशातील रेवा येथील सुहागी हिल्सजवळ बस आणि ट्राली ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जण जखमी झाले आहेत. बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. बसमधील सर्व लोक उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. या अपघातातील २० जखमींना प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेवाचे एसपी नवनीत भसीन यांनी दिली आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. घाट रस्ता उतरत असताना हा भीषण अपघात झाला. बस ट्राली ट्रकमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर बसमधील केबिनमध्ये ३-४ लोक अडकून बसले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू आणि जखमी झालेले लोक हे मजूर आहेत. ते दिवाळीसाठी घरी परतत होते.

ट्रॉली ट्रकचा समोरील ट्रकशी अपघात झाला. चालकाने ब्रेक लावल्याने पाठीमागून आलेली बस त्यावर धडकली असे प्रथमदर्शनी दिसते. घटनास्थळी पोलिस, प्रशासन आणि स्थानिक लोकांनी बचावकार्य केले. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती रेवाचे जिव्हाधिकारी मनोज पुष्प यांनी दिली.

हैदराबादहून गोरखपूरला जाणाऱ्या प्रवासी बसला रेवा येथे अपघात झाल्याची घटना दु:खद असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत म्हटले आहे. त्यांनी या अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्रभर बचावकार्य करण्यात आले. गंभीर जखमी प्रवाशांवर रीवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.

Back to top button