नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दहशतवाद हा मानवी हक्काचा सर्वात मोठा उल्लंघनकर्ता असल्याचे सांगतानाच सध्याच्या काळात इंटरपोलची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी इंटरपोलच्या 90 व्या सर्वसाधारण सभेचा समारोप करताना येथे केले. 164 देशांचे प्रतिनिधी सर्वसाधारण सभेस उपस्थित होते.
सीमेपलीकडील दहशतवाद हाणून पाडण्यासाठी इंटरपोल व त्याच्या सदस्य संस्थांना हातात हात घालून काम करावे लागेल, असे सांगून शहा पुढे म्हणाले की, गुन्हेगारी टोळ्या सिंडीकेटप्रमाणे काम करतात, त्यामुळे तपास संस्थांबरोबर जागतिक पोलिसांना सावध रहावे लागणार आहे. दहशतवाद हा मानवी हक्काचा सर्वात मोठा उल्लंघनकर्ता आहे. चांगला दहशतवाद, वाईट दहशतवाद, छोटा दहशतवाद, मोठा दहशतवाद अशा ज्या काही दहशतवादाच्या व्याख्या केल्या जात आहेत, त्या अतिशय घातक आहेत.
सध्याच्या गुन्हेगारी घटनांना देशांची राहिलेली नाही. अशा स्थितीत आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंटरपोलच्या सदस्य देशांनी मतभेद विसरुन एकत्र काम करणे आवश्यक आहे, असे सांगत शहा म्हणाले की, सीमेपलीकडील दहशतवाद हाणून पाडण्यासाठी सीमापार सहकार्य गरजेचे आहे. कट्टरतावाद ही राजकीय समस्या असल्याचे कोणी समजू नये. तसे समजले तर अर्धवट युध्द खेळले जाईल. बदलत्या काळानुसार जी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्यांचा मुकाबला करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सुरक्षा दलांमध्ये आमुलाग्र बदल केले आहेत. दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय डेटाबेस बनविण्याचे काम केंद्र सरकारने सुरु केले आहे.