पुढारी ऑनलाईन : पुढच्या ४८ तासांत संपूर्ण देशातून मान्सून माघारी (Withdrawal of Monsoon) परतणार असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातातून मान्सून माघारी जात असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच पुढील काही तासांत संपूर्ण देशातून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रासह विदर्भासह छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागातून माघार घेतली आहे. आज २१ ऑक्टोबरला तेलंगणाचा काही भाग, आंध्रप्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या मध्य भागातून मान्सून माघार घेणार असल्याचे, हवामान विभागाने सांगितले आहे. २१ ते २३ ऑक्टोबरला तमिळनाडूतील काही भागांत आणि केरळमध्ये वीजांच्या कडकडाटांसह वादळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे.