काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी बालपणी आईला जिवंत जळताना पाहिले! | पुढारी

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी बालपणी आईला जिवंत जळताना पाहिले!

बंगळूर; वृत्तसंस्था :  कर्नाटकातील वरवट्टी गावात मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म झाला. हे गाव कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यात आहे. ऑगस्ट 1947 मध्ये तत्कालीन म्हैसूर (आता कर्नाटक) राज्यातील हे वरवट्टी गाव निजामाच्या राजवटीत होते. फाळणीनंतर या राजवटीने केलेल्या जाळपोळीत स्वत:च्या आईला खर्गेंनी जिवंत जळताना पाहिले. करपलेले हे बालपण मोठ्या मेहनतीने पुढे बहरत गेले.

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा या भागात जातीय दंगली उसळल्या. निजामाच्या लष्कराने वरवट्टी गावावर हल्ला केला. या लुटारूंनी संपूर्ण गाव पेटवून दिले. या घटनेत याच गावातील एका घरात ज्या पाच वर्षांच्या मुलाने स्वत:च्या आईला जिवंत जळताना पाहिले, तो मुलगा म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे!

वडिलांनी लहानग्या मल्लिकार्जुनला वाचवले आणि हे बाप-लेक 3 महिने जंगलात राहिले. वडिलांनी मजुरी केली आणि मुलाला शिकवले. मल्लिकार्जुन यांनी विधीचे शिक्षण पूर्ण केले. ते वकील झाले. पुढे सतत आमदार म्हणून निवडून येत राहिले. कर्नाटक राज्यात मंत्री झाले. खासदार व नंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री झाले. बुधवारी ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

खर्गे यांचे वरवट्टी गावातील वडिलोपार्जित घर अर्थातच नामशेष झालेले आहे. घराच्या भिंतींचे दगड तेवढे उरले आहेत. खर्गे लहानपणापसून नेतृत्व करत आलेले आहेत. शाळेत मॉनिटर होते. कॉलेजमध्ये विद्यार्थी नेते. पुढे दलित समाजातून गुलबर्गा जिल्ह्यातील पहिले बॅरिस्टर झाले. आमदार झाले आणि पुढे आमदार म्हणून सतत 9 वेळा निवडून आले. दोनदा खासदारही होते. तीनवेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची संधी हुकली.

Back to top button