

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) हे सध्या बिहारमध्ये जन सुराज यात्रेवर आहेत. यादरम्यान ते बिहारमधील नितीशकुमार सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. पीके यांनी बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नितीशकुमार भाजपच्या संपर्कात असून त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केल्यास नवल वाटणार नाही. नितीश यांनी जेडीयूचे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या माध्यमातून भाजपसोबत चर्चेचा मार्ग खुला ठेवला आहे, त्यामुळे येणा-या काळात पुन्हा एकदा बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
प्रशांत किशोर जन सुराज यात्रेच्या माध्यमातून बिहारमध्ये स्वत:साठी राजकीय मैदान तयार करत आहेत. नुकताच त्यांनी नितीशकुमार हे भाजपच्या सतत संपर्कात असल्याचा दावा केला आहे. नितीश कुमार यांनी जेडीयूचे राज्यसभा सदस्य आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यामार्फत भाजपशी संवादाची दारे खुली ठेवली आहे. जेडीयूने भाजपशी संबंध तोडले असले तरी या कारणास्तव हरिवंश यांना त्यांच्या राज्यसभेच्या पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले. लोकांनी लक्षात ठेवावे की राजकारणातील जेव्हाही परिस्थिती बदलेल तेव्हा नितीश हे पुन्हा एकदा भाजप सोबत जाऊ त्यांच्यासोबत काम करू शकतात.
प्रशांत किशोर यांच्या खळबळजनक दाव्यानंतर जेडीयूकडून प्रतिक्रिया आली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे जाहीर केले आहे की ते आयुष्यात कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाहीत. नितीश कुमार 50 वर्षांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात आहेत आणि पीके यांनी सहा महिन्यांपूर्वी राजकारण सुरू केले आहे, असा टोला लगावत पीके यांचा हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले.