ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली | पुढारी

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला ‘मशाल’ चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २००४ साली पक्षाची मान्यता रद्द झाल्यापासून समता पक्ष त्यांच्या चिन्हावर कोणताही हक्क सिद्ध करू शकला नाही, असे न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी म्हटले आहे. समता पक्षाची स्थापना १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी केली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धगधगती मशाल हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला समता पार्टीने आक्षेप घेतला होता. ठाकरेंना दिलेली मशाल ही आमच्या पक्षचिन्हासारखीच असल्याचा दावा करत समता पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेने त्रिशुळ, मशाल आणि उगवता सूर्य ही तीन चिन्हे निवडणूक आयोगाला सूचवली होती. त्रिशुळ हे धार्मिक चिन्ह म्हणून तर उगवता सूर्य हे द्रमुक पक्षाचे चिन्ह असल्यामुळे शिवसेनेला देण्यास आयोगाने नकार दिला. धगधगती मशाल हे पूर्वी समता पार्टीचे चिन्ह होते. २००४ साली या पक्षाची मान्यता रद्द झाली म्हणून मशाल चिन्ह आयोगाच्या मुक्त यादीत समाविष्ट करण्यात येत असून, ते आपणास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे चिन्ह म्हणून बहाल करत आहोत, असे आयोगाने उद्धव यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले होते. याचा अर्थ आयोगाने मशाल चिन्ह आधी मुक्त यादीत समाविष्ट केले आणि मग ते उद्धव ठाकरेंना
दिले. असे असताना समता पार्टीने आयोगाच्या निर्णयाला हरकत घेतली होती.

हे ही वाचा :

Back to top button