Diwali Festival : मनोरथ पूर्ण करण्यासाठी ‘असे’ करा वसुबारसाचे ‘व्रत आणि पूजन’ | पुढारी

Diwali Festival : मनोरथ पूर्ण करण्यासाठी 'असे' करा वसुबारसाचे 'व्रत आणि पूजन'

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : दिवाळी हा सर्व सणांमधील सर्वात मोठा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशात दिवाळी हा वेगवेगळ्या सणांचा एकत्रित उत्सव म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. याची सुरुवात वसू-बारस पूजनाने होते. वसू-बारस हा गाय आणि वासरू यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून त्यांचे पूजन केले जाते. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

Diwali Festival : भारतात गायीला अतिशय पवित्र मानले गेले आहे. तिला ‘कामधेनू’ असेही म्हणतात. तर अनेक ठिकाणी तिला माता नंदिनी म्हणून संबोधतात. आपले सर्व मनोरथ पूर्ण करणारी वत्सला म्हणूनही गायीचे पूजन केले जाते. मात्र, वसू-बारस या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.

Diwali Festival : वसुबारसाचे व्रत आणि पूजन कसे करावे?

दाते पंचांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी वसुबारस हा सण शुक्रवार, 21 ऑक्टोबरला येत आहे. वसुबारसाच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी एकभुक्त म्हणजेच एक वेळ भोजन करून हे व्रत करावे. सकाळी-सायंकाळी अंगण स्वच्छ करून सुरेख रांगोळी साकारावी. सायंकाळी दिवे लावावे. या दिवशी घरात दूध किंवा दुधाचे पदार्थ तसेच तळलेले पदार्थ खाऊ नयेत. सायंकाळी सूर्यास्तानंतर गोरज मुहूर्तावर गाय आणि वासरू यांची खालील श्लोक म्हणून नैवेद्य दाखवून पूजा करावी…

ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।।
अर्थ -हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.

Diwali Festival : ज्यांच्या घरी गाय आणि वासरू आहे. त्यांनी गाय वासराला सकाळी छान आंघोळ घालावी. त्यांना हळदीने सजवावे. अंगावर सुरेख सुंदर वस्त्र टाकावे आणि सायंकाळी श्लोक म्हणून गायींना ओवाळावे.

शहरात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गाय-वासरूची पूजा करणे शक्य नाही. त्यांनी गाय-वासरूच्या मूर्तीची पूजा करावी. किंवा गाय वासरूचे चित्र काढून त्याची पूजा केली तरी चालते. मात्र, त्यांनी आपल्या जवळच्या गौशालेत गायीसाठी आपल्या शक्तीप्रमाणे चा-याची सोय करावी. गायींचे पूजन केल्यानंतर सुवासिनींनी आपला व्रत सोडावे.

हेही वाचा :

 

Back to top button