Covid-19 : पुण्यात ओमायक्रॉनचा BQ.1 सब-व्हेरियंट आढळला, वेगाने फैलावू शकतो, शास्त्रज्ञांचा इशारा | पुढारी

Covid-19 : पुण्यात ओमायक्रॉनचा BQ.1 सब-व्हेरियंट आढळला, वेगाने फैलावू शकतो, शास्त्रज्ञांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना (Covid-19) ओमायक्रॉनच्या बीएफ.७ (BF.7) हा नवीन सब-व्हेरियंट देशात नुकताच आढळून आला आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट आहे. BA.5.1.7 असे त्याचे नाव आहे. हा सब-व्हेरियंट वेगाने पसरतो. त्यानंतर लगेच पुण्यातील एका नमुन्यात BQ.1 हा आणखी नवीन एक सब-व्हेरियंट आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबतचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. याआधी गुजरातमध्ये BF.7 हा सब-व्हेरियंट आढळून आला होता. त्याची प्रथम चीनमध्ये नोंद झाली होती.

शास्त्रज्ञांनी ऑक्टोबरमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेंसिंगमध्ये पुण्यातील नमुन्यात BQ.1 सब-व्हेरियंट आढळल्याची पुष्टी केली आहे. देशातील जिनोम सव्‍‌र्हेलन्स नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या हवाल्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, “भारतात BQ.1 हा सब-व्हेरियंट आढळल्याची ही पहिलीच घटना आहे”.

“हे सर्व सब-व्हेरियंट पुढच्या पिढीतील स्ट्रेन किंवा SARS-CoV-2 च्या Omicron प्रकारातील संतती आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये Omicron ची नोंद झाल्यापासून या विषाणूचा पूर्णपणे नवीन प्रकार याआधी कधी पाहिला नाही. कोरोनाचा उपवंश (sublineages) म्हटल्या जाणार्‍या या सब- व्हेरियंटमध्येदेखील संक्रामक क्षमता अधिक आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. ओमिक्रॉनच्या BA.2 प्रकारातील उपवंश असलेला BA.2.75 हा सब-व्हेरियंटदेखील भारतात अधिक संक्रामक असल्याचे दिसत आहे, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मधील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

राज्य सरकारकडून खबरदारीचा इशारा

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या आठवड्याच्या तुलनेत १७.७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने XBB या सब-व्हेरियंटचा उल्लेख केला आहे. जो देशात प्रथमच आढळला आहे. हिवाळा आणि सणासुदीच्या काळात कोरोना आणखी वाढ होऊ शकते, असा इशाराही महाराष्ट्र सरकारने दिला आहे. ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीच्या तुलनेत १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान नवीन Covid-19 प्रकरणांमध्ये १७.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे, रायगड आणि मुंबईमध्ये ही वाढ दिसून आली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button