उत्तर भारतातील अंमली पदार्थ तस्‍करांसह गुंडावर ‘एनआयए’ची धडक कारवाई, ५०हून अधिक ठिकाणी छापे | पुढारी

उत्तर भारतातील अंमली पदार्थ तस्‍करांसह गुंडावर 'एनआयए'ची धडक कारवाई, ५०हून अधिक ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर भारतातील अंमली पदार्थ तस्‍करांसह गुंडांवर आज राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) धडक कारवाई केली. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली आणि एसीआर येथे छापे टाकण्यात आले. गुंड, अंमली पदार्थ तस्कर आणि दहशतवादी यांच्यातील संबंध उद्‍ध्‍वस्‍त करण्‍यासाठी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

गँगस्‍टर आणि दहशतवादी यांच्‍यातील संबंधाची तक्रार दिल्‍ली पोलीसात दाखल झाली होती. या प्रकरणाची एनआयए २६ ऑगस्‍टपासून चौकशी करत आहे. दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळ्याचे म्‍होरक्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळ्यांचे परदेशात असलेले कनेक्‍शनही तपासात उघड झाले होते. अनेक गुंडाच्‍या टोळ्याच्‍या म्‍होरक्‍यांनी पाकिस्तान, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलियासह परदेशातून आपली गँग चालवत आहेत, अशी माहिती एनआयएच्‍या सूत्रांनी दिली. यापूर्वीही हे उद्‍ध्‍वस्‍त करण्‍यासाठी देशभरात ६० ठिकाणी छापे टाकले हाेते.

हरियाणात गँगस्टरच्या घरावर छापा

‘एनआयए’ने हरियाणातील झज्जर येथील गँगस्टर नरेश सेठीच्या घरावर छापा टाकला. ‘एनआयए’चे पथक पहाटे चार वाजता सेठी यांच्या घरी धडक दिली. पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) यांच्यासह स्थानिक पोलिसही एनआयए पथकासोबत होते. सेठी यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आणि त्यांची मालमत्ता आणि बँक तपशील तपासण्यात आला. नरेश सेठी खून आणि खंडणीसह अनेक गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सामील होता. तो सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. त्‍याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशीही संबंध असल्‍याचेही तपासात उघड झाले आहे.

 

Back to top button