

पुढारी ऑनलाईन डेस्क : Balasahebanchi ShivSena : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या नावाची आणि चिन्हांची लढाई अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर थांबली आहे. आयोगाने आज (दि. 10) सायंकाळी ठाकरे आणि शिंदे गटांसाठी नव्या नावाची आणि चिन्हांची घोषणा केली. यात उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आले आहे. मात्र त्यांना चिन्हाबाबत उद्या पुन्हा तीन नवे पर्याय देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शिंदे गटाला नवे कोणते चिन्ह मिळणार याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, शिवसेना हे नाव आणि या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह शनिवारी (दि. 8) अंधेरी पोटनिवडणुकी पुरते गोठवल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाची पर्यायी नावे आणि चिन्हे मागितली होती. यानंतर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्ह आणि नावे आयोगाकडे पाठवली होती. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयोगाने मोठी घोषणा केली. यात मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला देण्यात आले. मात्र, शिंदे गटाच्या चिन्हाबाबत निर्णय देण्यात आलेला नाही. (Balasahebanchi ShivSena)
ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या शिवसेनेच्या नव्या नाव आणि चिन्हांपैकी दोन पर्याय समान होते. दोन्ही गटांनी त्रिशूल आणि उगवता सुर्य या चिन्हांचा पर्याय ठेवल्याची माहिती मिळाली होती. ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सुर्य आणि पेटती मशाल या चिन्हांचे पर्याय ठेवले, तर शिंदे गटाने त्रिशूल, उगवता सुर्य आणि गदा या चिन्हांचे पर्याय दिले होते. अशा स्थितीत दोन्ही गटांकडून त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही समान चिन्हे झाल्याने आयोगाकडून ठाकरे गटाला पेटती मशाल दिल्याचे समजते आहे. मात्र, शिंदे गटाच्या चिन्हाबाबत अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही.