Uddhav Thackeray vs Eknath Shinde | 'धनुष्यबाण' चिन्ह ठाकरे की शिंदे गटाचे?, आज निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता | पुढारी

Uddhav Thackeray vs Eknath Shinde | 'धनुष्यबाण' चिन्ह ठाकरे की शिंदे गटाचे?, आज निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हा संबंधीचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात अंतिम टप्यात पोहोचला आहे. काल, शुक्रवार पर्यंत आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्या संबंधी कागदपत्रे आणि उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने शिंदे गटाकडून शिवसैनिकांचे शपथपत्र आयोगाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

जवळपास ७ लाख शपथपत्र शिंदे गटाने आयोगाकडे सादर केल्याचे कळतेय. तर, ठाकरे गटाकडून आयोगात कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीनंतर आयोगाने शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठीची अंतिम मुदत दिली आहे. शनिवारी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे? यासंबंधी आयोगाकडून निकाल येण्याची शक्यता आहे.
शनिवार पर्यंत ठाकरे गटाकडून कुठले उत्तर मिळाले नाही तर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयोगाकडून ठणकावण्यात आले आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेते पदी तसेच अध्यक्षपदी निवड केली आहे. शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहेत तसेच १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे.
प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे १४४ पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे, असे शिंदे गटाकडून आयोगाकडे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात गेल्या काळात अनपेक्षितरीत्या घडलेल्या सत्तांतरानंतर (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे गटाला मिळणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर शुक्रवारी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. 8) दुपारी 2 पर्यंत ठाकरे गटाला मुदत दिली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत दावा केला आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवून मुदतवाढीची माहिती दिली आहे. तसंच त्यांना हवा असलेला शिंदे गटाचे वकील चिराग शाह यांच्या याचिकेचा तपशील 4 तारखेलाच ठाकरे गटाला पाठवल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. या पत्रासोबत पुन्हा एकदा तो तपशील पाठवला असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.

तत्पूर्वी, आजवर दोनवेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटाने आज (दि.7) पहिल्यांदाच आपले प्राथमिक लेखी निवेदन आयोगात सादर केले. शिंदे गटाची कागदपत्रं आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत अशी तक्रार करत ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली. बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला आज शेवटची मुदत होती. पक्षावर अजूनही आमचं वर्चस्व आहे हे सांगतानाच सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासाठी आपल्याला किमान 15 ते 20 दिवसांचा वेळ मिळावा ही मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र त्यांना आजपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जात, शिंदे गटाने म्हटले आहे की उद्धव ठाकरे गटाने चिन्ह गमावले आहे. ३ नोव्हेंबरच्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने चिन्हाच्या मुद्द्यांवर त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. शिवसेनेचे नेते, उपनेते, राज्य संपर्कप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, राज्यप्रमुख, सचिव, जिल्हाप्रमुख, राज्य विधीमंडळ आणि संसदेत पक्षाचे निवडून आलेले सदस्य तसेच महापौर आणि जिल्हा परिषदांचे अध्यक्ष यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता.

यापूर्वी आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलेली मुदत ७ ऑक्टोबरला संपली. त्यामुळे पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय देणार आहे. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यांच्या या मागणीच्या आधारे आयोगाने शिंदे गटाला नोटीस बजावत सविस्तर कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. ठाकरे गटाकडूनही प्राथमिक कागदपत्रे सादर केली असल्याचे कळतेय.

निवडणूक चिन्हासंबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात होणारी पहिली पोटनिवडणूक आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली. नियमानुसार सहा महिन्यात ही निवडणूक होणे गरजेचे आहे. निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेले चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असते. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

Back to top button