नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 'कफ सिरप'च्या (खोकल्यावरील औषध) वापराने गाम्बियातील विविध ठिकाणच्या 66 मुलांच्या किडनीवर विपरीत परिणाम होऊन त्यांचा मृत्यू ओढविला. कफ सिरपमधील काही घटक जीवघेणे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्पष्ट केले असून, भारतातील औषध कंपनीने तयार केलेल्या चार 'कफ सिरप'बाबत अलर्ट जारी केला आहे. केंद्रीय औषध नियंत्रकांनी कारवाईही सुरू केली आहे. 'डब्ल्यूएचओ'ने अलर्ट जारी करताच संबंधित कंपनीने आपल्या संकेतस्थळांवरून औषधांबद्दलची माहिती गायब केली आहे.
हे चारही कफ सिरप जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मापदंडांची पूर्तता करत नाहीत. ती असुरक्षित आहेत. मुलांना तर त्यामुळे फार धोका आहे, असा थेट अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने या औषधांच्या बाबतीत दिला आहे. जिवाला धोकादायक ठरणारे कफ सिरप तूर्त केवळ गाम्बियामध्ये आढळले आहे. अवैध पद्धतीनी ही उत्पादने अन्य देशांमध्येही विक्रीसाठी पाठवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सर्वांनी सतर्क राहावे, असा इशारा आरोग्य संघटनेने दिला आहे.
मुंबईत 1986 मध्ये 21 रुग्णांचा मृत्यू
मुंबईच्या एका रुग्णालयात 1986 मध्ये अनेक रुग्णांना उपचारादरम्यान ग्लिसरीन देण्यात आले होते. यानंतर किडनी निकामी झाल्याने 21 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ग्लिसरीनमध्ये 'डायथिलीन ग्लायकॉल' मिसळलेले होते, असे तपासणीत तेव्हा आढळून आले. जम्मू-काश्मीरमध्येही 2020 या वर्षात कफ सिरपमधील याच घटकामुळे 12 मुलांचा मृत्यू झाला होता.
तज्ज्ञ काय म्हणतात?
कार्बनचे संयुग असलेले 'डायथिलीन ग्लायकॉल' आणि 'इथिलीन ग्लायकॉल' हे या औषधातील घटक आरोग्य संघटनेने उद्धृत केले आहेत. यामुळे औषधाला गोडवा येतोे आणि मुले आढेवेढे न घेता औषध पिऊ शकतात. एक किलो औषधात हे घटक जास्तीत जास्त 0.14 मिलिग्रामपर्यंत मिसळले जाऊ शकतात, किलोमध्ये 1 ग्रॅमवर प्रमाण गेल्यास ते जीवघेणे ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'डब्ल्यूएचओ'ने गेल्या महिन्यात या गाम्बियातील मुलांच्या मृत्यूंची माहिती 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ला दिली होती. डब्ल्यूएचओेने जगभरातील सर्वच देशांना अशी उत्पादने आढळल्यास त्वरित सूचना देण्यास सांगितले आहे.