

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे नेते उदित राज यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर भाजपने राज यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. उदित राज यांनी राष्ट्रपतींबद्दल ज्या शब्दांचा उपयोग केला आहे, ते चिंताजनक आहे. याआधीही कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याबाबत अशा प्रकारची भाषा वापरली आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले.
"राष्ट्रपती मुर्मू म्हणतात की, देशातील 70 टक्के लोक गुजरातचे मीठ खातात. मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविण्यात आले आणि आदिवासींच्या नावाने मते मागण्यात आली. राष्ट्रपती बनल्यानंतर काय त्या आदिवासी राहिल्या नाहीत का, त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. पण आदिवासींच्या प्रतिनिधीही आहेत. अनुसूचित जाती/जमातींच्या नावावरुन मोठे व्हायचे आणि नंतर गप्प व्हायचे, अशावेळी रडायला येते…" अशी वादग्रस्त टिप्पणी उदित राज यांनी केली होती.
आपले वक्तव्य हे कॉंग्रेसचे अधिकृत वक्तव्य नसून ते वैयक्तिक असल्याचे सांगण्यास देखील उदित राज विसरले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राष्ट्रपतींबद्दल वापरलेले शब्द चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.