

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लष्कराची सत्ता असलेल्या म्यानमारमधील अज्ञातस्थळी 500 पेक्षा अधिक भारतीयांना बंदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व तरुण आयटी व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्याकडून फसवणुकीचे रात्रंदिवस काम करून घेतले जात आहे. काम न करणार्यास मरणयाताना दिल्या जात आहेत. भारत सरकारने त्यांना अनेक माध्यमांतून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने आतापर्यंत 32 जणांची सुटका केली आहे. आयटीशी संबंधित असलेल्या या सर्व तरुणांना गलेलठ्ठ पगाराचे आमिष दाखवून फसवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, आम्ही याबाबत म्यानमार सरकारकडून माहिती घेण्याचे काम करत आहोत. बंदींची सुटका करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील जाहिरातीवरून आम्ही संपर्क केला असल्याचे एका सुटका झालेल्या आयटी तरुणाने सांगितले. ही जाहिरात केवळ भारतातच नाही, तर दुबई आणि बँकॉकमध्येही पोस्ट करण्यात आली होती.
आयटी तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून थायलंडमध्ये बोलविले जाते. त्यानंतर विमानतळावरून म्यानमारमधील अज्ञातस्थळी तरुणांना नेले जाते आणि त्यानंतर पासपोर्टसह सर्व आवश्यक दस्तावेज काढून घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.