Bihar Politics : बिहारमध्ये पुन्हा राजकीय पेच! कृषिमंत्र्यांचा अचानक राजीनामा | पुढारी

Bihar Politics : बिहारमध्ये पुन्हा राजकीय पेच! कृषिमंत्र्यांचा अचानक राजीनामा

पटना, पुढारी ऑनलाईन : बिहारचे कृषी मंत्री सुधाकर सिंह यांनी राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे पाठवला आहे. सुधाकर सिंह यांचे वडील आणि आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. महाआघाडी सरकारमध्ये आरजेडी कोट्यातून मंत्री झालेले सुधाकर सिंह यांनी आपल्याच सरकारविरोधात भ्रष्टाचाराविरोधात आघाडी उघडली होती. अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

सुधाकर सिंह गेल्या महिन्यात त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत होते. त्यांनी कैमूर येथील सभेत थेट सरकारी अधिका-यांवरच जोरदार टीका केली होती. कृषी विभागात अनेक चोर आहेत आणि ते स्वत: या चोरांचे प्रमुख असून माझ्यावरही अनेक चोर असल्याची टीप्पणी त्यांनी केली होती. सिंह यांच्या या विधानावरून वादा निर्माण झाला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुधाकर सिंह यांना धारेवर धरले. मात्र, मी माझ्या विधानावर ठाम असून राजीनामा द्यायला तयार आहे. पक्षाचे सुप्रीमो लालू यादव आणि तेजस्वी यादव जे सांगतील ते मला मान्य असल्याचे सिंह यांनी प्रत्युत्तर दिले होते.

सरकारसाठी समस्या बनू इच्छित नाही

सुधाकर सिंह म्हणाले की, मला सरकारसाठी अडचणीचे व्हायचे नाही. मात्र, माझ्या राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, सुधाकर सिंह यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राजीनामा दिल्याचे आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी म्हटले आहे. आम्हाला हे प्रकरण वाढवायचे नव्हते, असेही त्यांनी सांगितले आहे.

राजीनामा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याची चर्चा

1992 मध्ये जगदानंद सिंह यांनीही लालू प्रसाद यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. लालू प्रसाद यांनीही तो राजीनामा बराच काळ आपल्याजवळ ठेवत राज्यपालांना पाठवला नाही. नंतर जगदानंद मंत्री पदावर कायम राहिले. सुधाकर सिंग यांच्याबाबतीतही तसेच असू शकते. कारण तांत्रिकदृष्ट्या हा राजीनामा योग्य नाही. जोपर्यंत तेजस्वी यादव मुख्यमंत्र्यांना याची माहिती देत ​​नाहीत आणि मुख्यमंत्री नितीश ते मान्य करत नाहीत, तोपर्यंत ते योग्य मानले जाणार नाही, अशी चर्चा आहे.

Back to top button