पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress Chief) निवडीच्या मुद्याला दिवसेंदिवस नवे वळण मिळत आहे. राजस्थानचे अशोक गेहलोत यांचे नाव यासाठी खूप चर्चेत आहे. या प्रकरणात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे देखील नाव चर्चेत आले आहे. पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत ते देखील उतरल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या हायकमांडने त्यांना दिल्लीला बोलावले आहे. दिग्विजय सिंह हे सध्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी केरळमधील मल्लपुरम येथे आहेत. पक्ष हायकमांडच्या आवाहनानुसार ते बुधवारी (२८ सप्टेंबर) संध्याकाळ पर्यंत दिल्लीत पोहोचतील. गांधी घराण्याशी चांगले संबंध आणि राजकारणात सक्रीय असल्याने त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात येईल असेल सांगितले जात आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शशी थरूर यांच्यानंतर आता अचानक विद्यमान राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांचे नाव चर्चेत आले आहे. पक्ष हायकमांडच्या सूचनेनुसार ते उमेदवारी अर्जही दाखल करू शकतात, अशी सुत्रांकडून माहिती आहे. ही सर्व परिस्थिती पाहता, काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress Chief) निवडणूक ही कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीपेक्षाही अवघड बनल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी गदारोळ सुरू असताना दिग्विजय सिंह यांच्या नावाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांचे विश्वासू नेते कमलनाथ यांचे दिग्विजय सिंह यांना दिल्लीला बोलावणे आले. फोन करून त्यांना बोलावणे धाडल्यानंतर ते देखील या पदाच्या निवडणुकीत उतरणार हे पक्के झाले आहे. कमलनाथ यांनीच त्यांचे नाव सोनिया गांधी यांना सुचवले असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय सिंह गुरुवारी किंवा 30 सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्षपदासाठी फॉर्म भरू शकतात.
दिग्विजय सिंह हे दीर्घकाळ मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य, 10 वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहीले आहेत. काँग्रेसचे सध्याचे राज्यसभा सदस्य म्हणून ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे पक्षाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक त्यांची गणती आहे. आता दिग्विजय सिंह हे खरोखरच काँग्रेसची कमान सांभाळतील का? हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे प्रभारी दिग्विजय सिंह हे सात सप्टेंबरपासून राहुल गांधींच्या सतत संपर्कात आहेत. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेला ज्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे गांधी परिवारातील दिग्विजय सिंह यांचे देखील मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच आता पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत दिग्विजय सिंह यांचे नाव आघाडीवर आले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख आहे. अशा स्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणते चेहरे आहेत, हे येत्या दोन दिवसांत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमधून दिसून येईल.
हेही वाचा