Ladakh Projects | लडाखमध्ये ३३५० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

तरुणांना सुविधा, रोजगार देण्यास प्राधान्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ladakh Projects |
Ladakh Projects | लडाखमध्ये ३३५० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण -
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लडाखचा विकास आणि तेथील तरुण पिढीला शिक्षण, रोजगार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. लडाखमध्ये सुमारे ३,३५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले.

मोदी म्हणाले, लडाखमधील तरुणांना दर्जेदार शिक्षणासाठी इतर शहरांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर शैक्षणिक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. स्थानिक उद्योजकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. लडाखमध्ये रस्त्यांचे जाळे सुमारे चार हजार किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे, तर मोठ्या पुलांची संख्या १९ वरून ७५ झाली आहे. हेलिपॅडची संख्या चारवरून ४० झाली असून, ९९ टक्के घरांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. आईस हॉकी आणि पर्वतारोहणात स्थानिक तरुणांनी ओळख निर्माण केली आहे.

लेह विमानतळाची क्षमता वाढणार

लेहमधील कुशोक बकुला रिनपोछे विमानतळाच्या नव्या प्रवासी टर्मिनलचे उद्‌घाटन हा या प्रकल्पांमधील महत्त्वाचा टप्पा आहे. सुमारे ६४० कोटी रुपये खर्चून उभारलेले हे टर्मिनल २३,८०० चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. यामुळे विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता १० लाखांवरून ३५ लाखांपर्यंत वाढणार आहे. विमानांची उड्डाणे हाताळण्याची क्षमताही तीनपट वाढू शकते. टर्मिनलच्या रचनेत लडाखच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब दिसते.

४० गावांत जलाशय

‘प्रोजेक्ट अमृत हिम सरोवर’अंतर्गत लडाखमधील ४० गावांत ४० जलाशय उभारले आहेत. बर्फ वितळल्यानंतर काही काळ पाण्याची उपलब्धता वाढते; मात्र पेरणीच्या हंगामात पाण्याची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत जलाशयांमध्ये पाणी साठवून त्याचा गरजेनुसार वापर करता येणार आहे.

जलविद्युत प्रकल्प, सांस्कृतिक वारशाचे जतन

लडाखमधील वीजपुरवठा मजबूत करण्यासाठी हानू येथे नऊ मेगावॅट क्षमतेचा लघू जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. तसेच ६६ केव्ही क्षमतेची दाह-हानू-खलत्सी दुहेरी परिपथ वीजवाहिनीही सुरू केली आहे. लेहमधील सिंधू घाटावर देशातील पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान उभारण्याची योजनाही जाहीर केली आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या शैलचित्रांचे आणि दगडांवरील कोरीव आकृत्यांचे जतन करणे, प्राचीन इतिहासाबाबत जनजागृती करणे आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या उद्यानाचा उद्देश आहे.

२९८ किमीचा रस्ता; प्रवासाचा वेळ तीन तासांवर

सीमा रस्ते संघटनेने उभारलेला २९८ किलोमीटर लांबीचा निम्मू-पदुम-दारचा रस्ता लडाखच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग जांस्कर खोऱ्यातून जात लेहमधील निम्मूला हिमाचल प्रदेशातील दारचाशी जोडतो. या मार्गामुळे पूर्वी सुमारे १२ तास लागणारा प्रवास आता तीन तासांत पूर्ण करता येईल. शिंकुन ला खिंडीतून जाणाऱ्या या मार्गाला सामरिकदृष्ट्याही महत्त्व आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news