अशोक गेहलोत समर्थक 82 आमदारांचे राजीनामे | पुढारी

अशोक गेहलोत समर्थक 82 आमदारांचे राजीनामे

जयपूर/नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या 82 आमदारांनी रविवारी रात्री सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे राजस्थानातील राजकीय पेच अधिकच चिघळला आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गेहलोत आणि त्यांचे स्पर्धक असलेले सचिन पायलट या दोघांनाही तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी हाय कमांडचा कौल सचिन पायलट यांना आहे. गेहलोत गट त्यामुळे नाराज झाला आहे. विधिमंडळ पक्ष बैठकीपूर्वीच गेहलोत गोटातील जवळपास 82 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामे सादर केले आहेत. दुसरीकडे मंत्री तसेच गेहलोत गटातील प्रताप सिंह खाचरियावास यांनी त्यांच्याकडे 92 आमदार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसविरोधात बंडखोरी करणार्‍यांतून कुणालाही मुख्यमंत्री करण्यात येऊ नये, एवढीच आमची मागणी आहे. खाचरियावास यांचा रोख अर्थातच पायलट यांच्याकडे आहे. हाय कमांडने अशोक गेहलोत, सचिन पायलट, अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना दिल्लीला पाचारण केले आहे. गेहलोत आणि पायलट दोघांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न हाय कमांडकडून केला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

तत्पूर्वी सचिन पायलट त्यांचे समर्थक आमदार आणि अन्य काही आमदार विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी ‘सीएम हाऊस’ला दाखल झाले. तत्पूर्वी मुख्यमंत्री गेहलोत, निरीक्षक खर्गे, प्रदेश प्रभारी अजय माकन हेही हजर झालेले होते. पण आमदारच उपस्थित नसल्याने बैठक रद्द झाली.

राजस्थानातील आगामी मुख्यमंत्री कोण हे ठरविण्यासाठी रविवारी जयपुरात बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकुणात काँग्रेस अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन घडले. एक तर पक्षाचे निम्मेच आमदार बैठकीला आलेे होते. बहुतांश आमदारांनी गेहलोत हेच मुख्यमंत्रिपदीही हवेत म्हणून आग्रह धरला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आगामी मुख्यमंत्री कोण, यावर चर्चाही झाली नाही. मंत्री राजेंद्र गुढा हे निम्मेच आमदार बैठकीला आलेले असल्याने बहुमताने फैसला होणे शक्य नाही, असे सांगून निघून गेले. काँग्रेसच्या एकूण 107 आमदारांपैकी निम्म्याहून कमी बैठकीला हजर होते. पुढे हे आमदारही तावातावात निघून गेले.

गेहलोत हे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ‘एक व्यक्ती एक पद’ या काँग्रेसमधील धोरणानुसार अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास गेहलोत यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार, असे स्पष्ट संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळाले आहेत. दस्तुरखुद्द गेहलोत यांनीही अध्यक्षपदी माझी निवड झाल्यास मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर नवा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी रविवारी जयपुरात विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र आमदारांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे बैठकीचा फियास्को झाला.
इकडे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांनीही आपला दावा सांगितला आहे.

थरूर 30 रोजी अर्ज भरणार

शशी थरूर हे 30 सप्टेंबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जयपूरमध्ये रविवारी सायंकाळी मंत्री शांतिलाल धारिवाल यांच्या बंगल्यावर विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वीच सचिन पायलट यांचा मार्ग सोपा नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. गेहलोत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरी राजस्थानात मुख्यमंत्री म्हणूनही तेच हवेत, असे अपक्ष आमदार संयम लोढा यांनी सांगितले. मंत्री महेंद्रजित सिंह मालवीय यांनीही लोढा यांचे म्हणणे उचलून धरले. मुख्यमंत्री बदलण्याची काही गरज नाही, असे ते म्हणाले.

थोडक्यात काय, तर गेहलोत यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होण्याआधीच राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री निवडण्याची कसरत सुरू झाली आहे. त्यावरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पायलट यांच्यासह सी. पी. जोशी यांच्या नावाचीही मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा आहे. अशोक गेहलोत 28 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील. खुद्द गेहलोत यांनी अध्यक्ष झाल्यास मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेहलोत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार हे ठरल्यात जमा आहे. राजस्थानात काँग्रेसच्या विजयानंतर 2018 मधील चित्राची पुनरावृत्ती पुन्हा एकदा दिसते आहे. तेव्हा गेहलोत किंवा सचिन पायलट यांच्यापैकी एकाची निवड मुख्यमंत्रिपदासाठी करायची होती. यावेळी तूर्त सचिन पायलट आणि सी. पी. जोशी यांची नावे हाय कमांडसमोर आहेत. पायलट यांना गेहलोत यांचा विरोध आहे. आता हायकमांडच्या मध्यस्थीने तिढा सुटतो, की पेच वाढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Back to top button