New Delhi : नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांची सोनिया गांधींसोबत खलबते | पुढारी

New Delhi : नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांची सोनिया गांधींसोबत खलबते

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर विरोधी आघाडी मजबूत करण्याच्या मोहिमेला वेग दिला जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना दिली. लालूप्रसाद यादव यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जदचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी सोनियांची भेट घेतली.

विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी आपण काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची जरूर भेट घ्या, सल्ला सोनियांनी दिला असल्याचेही लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी होऊ शकत नाही, अशी टिप्पणीही यादव यांनी केली. सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला कसे पराभूत करता येईल, यावर चर्चेचा जोर होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तमाम विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न नितीश आणि लालू यादव करीत आहेत. रविवारची बैठक हा त्याचाच भाग होता. विरोधी पक्षांची भरीव आघाडी व्हावी, यासाठी आगामी काळात नितीश आणि लालू यांच्याकडून तेलंगण राष्ट्रसमिती, वायएसआर काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल, सपा, बसपा, बिजू जनता दल, पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स तसेच केरळमधील डाव्या पक्षांशी संपर्क साधला जाणार असल्याचे समजते. तब्बल पाच वर्षानंतर नितीश आणि लालू हे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर नितीश कुमार म्हणाले की, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही आता काळाची गरज बनली आहे. भाजपशी लढा देण्याच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकाच रांगेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

हेही वाचा

Back to top button