नवी दिल्ली; पुढारी वृत्तसंस्था : आम्ही मिंधे नाही, बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. आम्हाला अस्मान दाखवू म्हणणार्यांना आम्ही तीन महिन्यांपूर्वीच अस्मान दाखवले. आम्ही ठेचा खाऊन मोठे झालो, म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता; पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारे तुम्हाला म्हणावे का? असा सणसणीत पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी केला.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनासाठी आणि शिवसैनिकांना एकवटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदेंनी संबोधित केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसैनिकांवर विश्वास नाही म्हणून शपथपत्र ते लिहून घेत आहेत. आम्ही ठेचा खाऊन मोठे झालो म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले. आम्हाला बाप चोरणारी टोळी असल्याचे ते म्हणाले. आम्हाला अभिमान आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत; मग तुम्ही लोक बाप आणि बापाचा पक्ष विकणारे, असे आम्ही म्हणायचे का?
खुर्चीच्या हव्यासापोटी भाजपला दूर करून शिवसेना पक्षप्रमुखांनी राष्ट्रवादी, काँग्रेसशी संधान साधून सत्ता स्थापन केली. सरकार आमचे; पण आमच्याच लोकांवर या सत्तेत अन्याय सुरू होता. आमचे लोक जेलमध्ये टाकले जात होते. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत असूनही शिवसेनेवर अन्याय झाला, असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन करू हे आम्ही जनतेला आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात दुसर्यांशीच घरोबा केला. ही जनतेशी प्रतारणा होती, जनतेने भाजप-शिवसेनेला मते दिली होती म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. सर्व लोकांनी मला सांगितले की, राज्यात परिवर्तनाची गरज आहे. आम्ही परिवर्तन केले. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना माननारे शिवसैनिक आहोत. आम्ही आनंद दिघेंच्या मार्गावर चालणारे कार्यकर्ते आहोत. शिवसेनेला कसे पुढे न्यायचे, हे सर्व आपणास माहीत आहे. भेटीगाठी व्हायला हव्यात, हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांच्या विचारधारेला राज्याबाहेर पुढे नेण्याचे काम तेथील शिवसैनिक करीत आहे. जगातील 33 देशांनी आमच्या उठावाची दखल घेतली. सत्तेसाठी नव्हे, तर आम्ही न्यायासाठी उठाव केला. आम्ही सत्तेचा त्याग केला आणि विरोधकांत जाऊन बसलो.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अन्यायाची परिसीमा असते. सत्ता असूनही अडीच वर्षांत कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू होता. पूर्ण देशात बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना पुढे जाईल. स्थानिकांना न्याय द्यायला हवा.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेवर कुणाचीच मालकी नाही. शिवसेना बाळासाहेबांची आहे. पक्षातील लोकांना नोकर समजत असाल, तर तसे नाही. दिवस-रात्र मेहनत करून कार्यकर्त्यांनी शिवसेना पुढे नेली, ती शिवसेना प्रायव्हेट लिमिडेट कंपनी नाही. आम्हाला जनतेने समर्थन दिले. ग्रामपंचायत निवडणुकीतही ठाकरे गट सहाव्या क्रमांकावर पोहोचला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यप्रमुखांना आधी कधीच फोन गेले नाहीत, आता त्यांना आम्ही बोलावले आहे. राज्याच्या प्रमुखांशीही संपर्क केला जात नाही. कार्यकर्त्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, ही चांगली बाब आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अडीच वर्षांत गटप्रमुखांची आठवण आली नाही. आता आली, त्यांना अडीच वर्षे काडीची किंमत दिली नाही. 'वर्षा'वर प्रवेश नव्हता. 'मातोश्री'वर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्हाला गद्दार म्हणतात; पण आम्हीच हिंदुत्वाचे, बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेले. त्यांनी सत्तेच्या मोहात हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले. गद्दार कोण आणि खुद्दार कोण, हे सर्व जनतेला माहीत आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन त्यांनी लोकांचे जनमत घालवले. मुख्यमंत्र्यांनी राज्यप्रमुख सोडा, गटप्रमुखांना तरी रोजगार दिला का? जेव्हा त्यांना मुंबईला बोलावले जात होते तेव्हा ते कसे येत होते, त्यांच्याकडे गाडीभाडे नव्हते. त्यांनाच मी नगरविकास मंत्रालयामार्फत निधी दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काही लोक घेण्याचे काम करतात, मी देण्याचे काम करतो. आम्हाला खोके म्हणतात; पण माझ्याशिवाय त्यांचा हिशेब कुणाला माहीत आहे. आम्ही केलेले काम सर्व जगाने पाहिले. आमचे कमी आमदार असतानाही आम्हाला मुख्यमंत्रिपद दिले. कोण खरे बोलतेय, ही विचार करण्याची गोष्ट आहे.