Chandigarh university : आरोपी मुलीला ब्लॅकमेल करून व्हिडीओ बनवायला भाग पाडले | पुढारी

Chandigarh university : आरोपी मुलीला ब्लॅकमेल करून व्हिडीओ बनवायला भाग पाडले

चंदीगड; वृत्तसंस्था : पंजाबातील चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh university) मुलींचे खासगी, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल प्रकरणात पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाईलमधून तिचे स्वत:चे 12 खासगी व्हिडीओ रिकव्हर केले आहेत. हे व्हिडीओ आरोपी तरुणीने तिच्या मित्राला पाठवले होते. याच व्हिडीओंच्या आधारे मित्राने आरोपी तरुणीला अन्य मुलींचे व्हिडीओ चित्रण करण्यास भाग पाडले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपी मुलीच्या मोबाईलनंतर आता तिचा लॅपटॉपही जप्त केला आहे. आरोपी मुलगी अन्य मुली अंघोळ करत असताना त्यांचे व्हिडीओ बनवत असे. सातत्याने सुरू असलेला हा प्रकार एका मुलीच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीला आला होता. तोवर आरोपींनी सोशल मीडियावर मुलींचे व्हिडीओ व्हायरल केले होते. (Chandigarh university)

आरोपी विद्यार्थिनीला सनी मेहता हा तिचा जवळचा मित्र तसेच रंकज वर्मा हा दुसरा मित्र ब्लॅकमेल करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर विद्यार्थिनींचे व्हिडीओ मागवत होते. या आरोपींच्या मोबाईलवरून दिल्ली, मुंबई व गुजरातलाही सातत्याने करण्यात आलेल्या कॉलमुळे त्यांचे एखाद्या मोठ्या नेटवर्कशी संबंध तर नाहीत, असा संशय पोलिसांना आहे. त्याची खात्री केली जात आहे. (Chandigarh university)

चॅटवरून चौथा आरोपीही समोर

या प्रकरणात मोहित नावाच्या चौथ्या आरोपीची एन्ट्री झाली आहे. आरोपी विद्यार्थिनीच्या व्हॉटस्अ‍ॅप चॅटमधून मोहितचे नाव समोर आले आहे. या चॅटमध्ये तो तिला विद्यार्थिनींचे व्हिडीओ व फोटो डिलिट करण्यास सांगत आहे. मुली अंघोळ करतात तेव्हा मी व्हिडीओ बनविते, हे एकीच्या लक्षात आल्याची कबुलीही या चॅटमध्ये आरोपी मुलीने मोहितशी बोलताना दिल्याचे समोर आले आहे.

Back to top button