विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; आंदोलन सुरूच | पुढारी

विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; आंदोलन सुरूच

चंदीगड; वृत्तसंस्था : पंजाबातील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील वसतिगृहातून 60 वर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनांची निदर्शने सुरूच असून, ती पाहता विद्यापीठ प्रशासनाने दोन दिवस विद्यापीठ बंद ठेवले जाईल, असे जाहीर केले आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीरपणे घेतली असून, सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अन्य मुलींचे अंघोळ करत असतानाचे व्हिडीओ चित्रण करणार्‍या विद्यार्थिनीला तसेच हे व्हिडीओ व्हायरल करणार्‍या तिच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या कार्यालयाला घातलेला घेराव सोमवारीही कायम होता. पंजाब पोलिस आणि चंदीगड विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा आणि ते अत्यंत सौम्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विविध विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

आमच्या मोबाईलमध्ये हे सगळे व्हिडीओ धडधडीत दिसत असताना कोणताही व्हिडीओ व्हायरल झालेला नाही, असा दावा पोलिस व विद्यापीठ प्रशासन करत असल्याने आम्हाला या दोन्हीही यंत्रणांवर विश्वास नाही, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

वसतिगृहात 8 मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आवारात रात्री अ‍ॅम्ब्युलन्स धडकल्याचे आम्ही बघितले आणि याउपर कोणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा दावा पोलिस करत आहेत. त्यामुळे पोलिसांवर तर आम्हाला अजिबातच विश्वास नाही, असे एका आंदोलक विद्यार्थिनीने सांगितले. दरम्यान, पंजाब सरकारकडून प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पंजाब पोलिसांनी पत्रही लिहिले असून, या प्रकरणात कोणाचीही गय खपवून घेतली जाणार नाही, असे या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, वसतिगृहातील वॉर्डन बदलण्यासह वेळेसंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्या विद्यापीठ प्रशासनाने मान्य केल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाने अंतर्गत चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमली आहे.

रंकज वर्मा, सनी मेहताची कबुली

रंकज वर्मा (शिमला) व सनी मेहता (रोहडू) या व्हिडीओ व्हायरल करणार्‍या आरोपी युवकांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू आहे. व्हिडीओ अपलोड व व्हायरल केल्याचे या दोघांनी कबूल केल्याचे सांगण्यात येते. अन्य विद्यार्थिनी अंघोळ करत असताना व्हिडीओ बनविणारी आरोपी विद्यार्थिनी तसेच सनी मेहता हे दोघे हिमाचल प्रदेशातील रोहडू गावचे आहेत. दोघांची खूप आधीपासून जवळीक आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी युवतीने चित्रित केलेले व्हिडीओ सनीला पाठविले होते.

Back to top button