Booster Dose : देशभरात बुस्टर डोस घेण्याकडे नागरिकांची पाठ | पुढारी

Booster Dose : देशभरात बुस्टर डोस घेण्याकडे नागरिकांची पाठ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु बुस्टर डोसला (Booster Dose) म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. आतापर्यंत केवळ २४ टक्के नागरिकांनी कोविड-१९ लसीचा बुस्टर डोस घेतला आहे. महाराष्ट्रात केवळ १३ टक्के लोकांनीच बुस्टर डोस घेतला आहे. तथापि, अनेक राज्यांची कामगिरी अत्यंत खराब आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. उत्तर प्रदेशमध्ये लसीचा बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक ३९ टक्के आहे.

पात्र लोकसंख्येमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मोफत बुस्टर डोस मोहीम सुरू केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत ७५ दिवस मोफत प्रतिबंधात्मक लस देण्याची घोषणा केली होती.

Booster Dose : उत्तर प्रदेशची चांगली कामगिरी

सरकारी आकडेवारीनुसार, हरियाणा आणि झारखंड या राज्यांतील केवळ १० टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. तर महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, तामिळनाडू आणि इतर अनेक राज्यांमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत २४ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.

केरळमध्ये १३ टक्के, महाराष्ट्रात १३ टक्के, राजस्थानमध्ये १५ टक्के, तामिळनाडूमध्ये १७ टक्के आणि कर्नाटकमध्ये १९ टक्के नोंद झाली आहे. त्याचवेळी बिहारसारख्या राज्यांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बिहारमध्ये २६ टक्के, गुजरातमध्ये ३७ टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये ३९ टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

आतापर्यंत २१६.५६ कोटी डोस देण्यात आले आहेत.

 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ३.७० कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस अजूनही उपलब्ध आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत २०३.०३ कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत देशभरात कोविड-१९ लसीचे २१६.५६ कोटी डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button