Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराच्या भिंतीला सोन्याचा मुलामा चढवण्यास पुजाऱ्यांचा विरोध

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराच्या भिंतीला सोन्याचा मुलामा चढवण्यास पुजाऱ्यांचा विरोध

देहरादून; पुढारी ऑनलाईन : केदारनाथ मंदिराच्या (Kedarnath Temple)  पुजार्‍यांच्या एका वर्गाने मंदिरातील गर्भगृहाच्या आतील भिंतींवर सोन्याचा मुलामा लावण्यास विरोध केला आहे. अनेक वर्षाच्या जुन्या परंपरेशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोप पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच या कामावेळी मोठ्या ड्रिलिंग मशिनचा वापर केल्याने मंदिराच्या भिंतींना तडे जात असल्याचे सांगत पुजाऱ्यांनी सोन्याचा मुलामा चढविण्याच्या या कामाला विरोध दर्शविला आहे. हिमालयात असणाऱ्या या केदारनाथाच्या प्रसिद्ध मंदिराच्या भिंती या चांदीने मढलेल्या आहेत. आता त्या चांदीचे अस्तर काढून त्यांना सोन्याने मढवले जात आहे.

ड्रिलिंगमुळे मंदिराच्या भिंतींना पडत आहेत तडे (Kedarnath Temple)

मंदिराच्या भिंतींवर सोन्याचा मुलावा चढवण्याची प्रक्रिया तेव्हा सुरु करण्यात आली जेव्हा महाराष्ट्रातील एका शिवभक्ताने या कामी लागणारे सोने स्वेच्छेने अर्पण करण्याची ईच्छा व्यक्ती केली. या नंतर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) राज्य सरकारकडून सदरचा प्रस्ताव मान्य करुन घेतला. याबाबत येथील पुजारी संतोष त्रिवेदी म्हणाले, "सोन्याचा मुलामा दिल्याने मंदिराच्या भिंतींचे नुकसान होत आहे. त्यासाठी मोठ्या ड्रिलिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. मंदिराच्या जुन्या परंपरांशी होणारी हेळसांड आम्ही सहन करू शकत नाही."

पुजार्‍यांमध्ये मतभेद (Kedarnath Temple)

मात्र, काही ज्येष्ठ पुजारी मंदिराच्या गर्भगृहात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाच्या बाजूने असल्याने या मुद्द्यावर पुजार्‍यांमध्ये मतभेद आहेत. मंदिराचे ज्येष्ठ पुजारी श्रीनिवास पोस्ती आणि केदार सभेचे माजी अध्यक्ष महेश बागवाडी म्हणाले की, मंदिर हे सनातनच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे आणि त्याच्या भिंतींवर सोन्याचा मुलामा चढवणे हिंदू श्रद्धा आणि परंपरांशी सुसंगत आहे. बीकेटीसीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले की, मंदिराच्या भिंतींवर सोन्याचा मुलामा चढवण्याला विरोध करणे समर्थनीय नाही कारण मूळ रचनेशी छेडछाड न करता हे परंपरेनुसार केले जात आहे.

हिंदू मंदिरे भव्यतेचे प्रतीक (Kedarnath Temple)

यावेळी अजेंद्र अजय म्हणाले, "मंदिराचे वेळोवेळी नूतनीकरण आणि सुशोभीकरण ही एक सामान्य गोष्ट आहे. काही निवडक पुजारी याला विरोध करू शकतात, पण त्यांच्या प्रतिनिधी मंडळांनी कधीच विरोध केला नाही. काही दशकांपूर्वी मंदिराचे छत गवत आणि लाकडाचे होते. जसजसा वेळ निघून गेला, तसतसे ते दगड आणि नंतर तांब्याच्या पत्र्यांनी बांधले गेले." बीकेटीसी अध्यक्षांनी या विरोधाला "विरोधकांच्या प्रचाराचा" भाग असल्याचे म्हटले आहे. अजेंद्र अजय पुढे म्हणाले, "देशभरातील हिंदू मंदिरे भव्यतेचे प्रतीक आहेत. हिंदू देवतांना सोने आणि दागिन्यांनी सजवणे हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. मंदिराच्या भिंतींवर सोन्याचा मुलामा चढवण्यात मला काही गैर वाटत व दिसत नाही."


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news