अहमदाबाद: बँक खात्यात चुकून 11,677 कोटी आले; 2 कोटी गुंतवले! | पुढारी

अहमदाबाद: बँक खात्यात चुकून 11,677 कोटी आले; 2 कोटी गुंतवले!

अहमदाबाद; वृत्तसंस्था: गुजरातमधील अहमदाबादेतील एका बँकेत चूक झाली. यातून रमेश सागर नामक यांच्या खात्यात चुकून 11 हजार 677 कोटी रुपये जमा झाले. रमेश सागर एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय करतात. शेअर बाजारात ट्रेडिंगही करतात. जमा रक्कम पाहून ते हुरळले नाहीत. पुढच्या 30 मिनिटांत यातील 2 कोटी रुपये त्यांनी शेअर बाजारात गुंतविले आणि अर्ध्या तासात 5 लाख रुपये
कमविले.

26 जुलै रोजी घडलेली ही घटना कर्णोपकर्णी पसरल्याने आता समोर आली आहे. या दिवशी खात्यात जमा झालेली एवढी मोठी रक्कम पाहून ते अवाक् झाले होते. पण, ती काही वेळासाठीच आली आहे, याचे भानही सागर यांना लगेच आले. तत्काळ निर्णय घेत त्यांनी शेअर बाजारात 2 कोटी रुपये गुंतवून टाकले. जमा झालेले पैसे परत गेले तरी गुंतवणुकीतून मिळणारा नफा आपल्याकडेच राहील, याची सागर यांना खात्री होती आणि घडलेही तसेच! त्यांना या व्यवहारात 5 लाख रुपये नफा झाला. बँकेने चुकून जमा झालेले 11,677 कोटी रुपये सागर यांच्या खात्यातून काढून घेतले. पण सागर यांनी त्यातून कमविलेले 5 लाख त्यांच्याच खात्यात राहिले!

Back to top button