Ashok Gehlot : अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता, कारण… | पुढारी

Ashok Gehlot : अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashok Gehlot : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास अवघे 9 दिवस उरले आहेत. मात्र, पक्ष सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रे’मध्ये व्यस्त आहे. दरम्यान, काँग्रेस हायकमांडने अध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड केली असून ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असतील, अशी चर्चा आहे. पण प्रकरण इथेच संपत नाही. अशोक गेहलोत यांच्या विरोधात शशी थरूर किंवा ‘जी तेवीस’मधील अन्य कोणी नेते अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात, अशीही जोरदार चर्चा आहे. असे झाल्यास काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणुकीची परिस्थिती निर्माण होईल आणि हे प्रदीर्घ काळानंतर घडेल.

काँग्रेस इतिहासात केवळ दोनदाच बंडखोर नेते झाले अध्यक्ष

काँग्रेसच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास अशी दोन प्रकरणे समोर येतात ज्यावेळी बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवून ती जिंकली होती. यात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पुरुषोत्तम दास टंडन यांच्या नावाचा समावेश आहे. बोस यांनी महात्मा गांधी तर टंडन यांनी नेहरूंना विरोध केला होता. दोघांनी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांच्या विरोधात जाऊन बंडखोरी करून निवडणूक लढवली आणि ती जिंकली होती. पण अखेर बोस-टंडन या दोघांनीही निवडून आल्यानंतरही माघार घेतली होती.

सध्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास अवघे 9 दिवस उरले आहेत. अशातच एक महत्त्वाची अपडेट सूत्रांच्या अहवानुसार समोर येत आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, 73 वर्षीय अशोक गेहलोत हे पक्षाच्या अध्यक्षपदासाठी बिगर गांधी चेहरा म्हणून परिपूर्ण असतील, असे हायकमांडला वाटते. याचे कारण ते ओबीसी समाजातून आलेले आहेत. त्यांनी तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेसमध्येही त्यांचा मोठा दबदबा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सोनिया, राहुल गांधी आणि प्रियांका या तिघांचेही जवळचे नेते मानले जातात. अशा स्थितीत हायकमांडला त्यांना हटवून कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, असे समजते आहे.

गेहलोत अध्यक्ष झाले तर मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार?

24 ते 30 सप्टेंबर दरम्यान अशोक गेहलोत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात अशी चर्चा आहे. असे झाले तर त्यांच्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशोक गेहलोत यांच्यानंतर सचिन पायलट यांचे नाव निश्चितच चर्चेत आले आहे, पण स्वत: गेहलोत यांना त्यांचा विश्वासू असा उत्तराधिकारी निवडायचा असल्याचे समजते आहे. अशा परिस्थितीत अध्यक्षपदासोबतच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा काँग्रेसमध्ये गदारोळ होऊ शकतो, अशी चिन्हे आहेत. राजस्थानमध्ये समतोल साधण्यासाठी काँग्रेस हायकमांड अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव याला नव्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनवू शकतात. याशिवाय गेहलोत यांनाही भविष्यात राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ‘जी तेवीस’ मधील उर्वरित नेते सक्रिय झाले आहेत. ते स्वतःला प्रभावशाली बनवण्यासाठी सर्व कायदेशीर आणि लोकशाही मार्गांचा शोध घेण्यास उत्सुक असल्याचे समजते आहे.

Back to top button