गुगल ट्रॅकर द्वारे शिक्षकांच्या लसीकरणावर केंद्राचे लक्ष | पुढारी

गुगल ट्रॅकर द्वारे शिक्षकांच्या लसीकरणावर केंद्राचे लक्ष

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशात किती शिक्षकांचे लसीकरण झाले आहे, याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण मंत्रालय गुगल ट्रॅकर च्या सहाय्याने देशभरातील शिक्षकांच्या लसीकरणावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, या पाहणीतून 80 टक्के शिक्षक आणि शिक्षकांशिवाय इतर स्टाफने एक किंवा दोन डोस घेतल्याचे समोर आले आहे. देशात 10 राज्यांमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू केली जात आहेत. त्यासोबतच अनेक राज्यात लहान मुलांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय आठवड्यातून दोन वेळा गुगल ट्रॅकर द्वारे शिक्षक आणि इतर स्टाफच्या लसीकरणाची माहिती घेत आहेत. राज्यांनाही जिल्हास्तरावर शाळेतील स्टाफच्या लसीकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षकांच्या लसीकरणाचा राज्यांचा प्रयत्न आहे.

देशात दिवसात 45 हजार 352 बाधित, 366 मृत्यू

देशात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने केंद्र सरकारच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 45 हजार 352 कोरोनाबाधितांची नोंद झाली. 34 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 366 रुग्णांचा मृत्यू झाला.

केरळमध्ये गुरुवारी 32 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर 188 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 29 लाख 3 हजार 289 वर पोहोचली आहे. यातील 3 कोटी 20 लाख 63 हजार 616 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 3 लाख 99 हजार 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 39 हजार 895 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 67 कोटी 9 लाख 59 हजार 968 डोस दिले आहेत. यातील 74 लाख 84 हजार 333 डोसचे लसीकरण गुरुवारी झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 4 कोटी 36 लाख 81 हजार 760 डोस शिल्लक आहेत. येत्या काळात 1 कोटी 20 लाख 95 हजार 700 डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात येणार असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी आठवड्याचा कोरोना संसर्गदर 2.66 टक्के नोंदविण्यात आला, तर दैनंदिन कोरोना संसर्गदर 2.72 टक्के नोंदविण्यात आला.

Back to top button