अयोध्येत राम मंदिरावर होणार 1,800 कोटी खर्च | पुढारी

अयोध्येत राम मंदिरावर होणार 1,800 कोटी खर्च

अयोध्या; वृत्तसंस्था :  अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या उभारणीचे काम झपाट्याने सुरू असून, त्यासाठी तब्बल 1,800 कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जेव्हा राम मंदिराचे काम हाती घेण्यात आले, तेव्हा वास्तुरचनाकारांच्या मंडळाने चारशे कोटी रुपये लागतील, असा अंदाज व्यक्त केला होता, हे विशेष…

आतापर्यंत मंदिराचे सुमारे चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी या भव्य मंदिराचे भूमिपूजन केले होते. फैजाबाद येथील शासकीय अतिथीगृहामध्ये रविवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीविषयी आदेश दिल्यानंतर या ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. ट्रस्टमध्ये एकूण पंधरा सदस्यांचा समावेश असून, महंत नृत्य गोपाल दास हे त्याचे अध्यक्ष आहेत. आजच्या बैठकीला चौदा सदस्य उपस्थित होते.

ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी माध्यमांना सांगितले की, या मंदिर संकुलात हिंदू धर्मातील विविध महान साधू-संतांच्या प्रतिमा बसवण्यात येणार आहेत. त्यामध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, निषादराज, शबरीमाता, जटायू यांच्याही प्रतिमा असतील.

सुरक्षा कवच ‘सीआयएसएफ’कडे

मंदिर संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्याविषयी ट्रस्टच्या बैठकीत विचारविनिमय झाला.
मंदिराच्या कामातील प्रगतीचा अहवाल वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.

पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत मंदिर साकारणार

पुढील वर्षी (2023) डिसेंबरपर्यंत मंदिराचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांची मूर्ती गर्भगृहात विधिवत स्थापन केली जाईल, असा अंदाज असल्याचे राय यांनी नमूद केले. या गर्भगृहाची कोनशिला यंदाच्या जूनमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती. मुख्य म्हणजे 1,800 कोटी रुपयांचा खर्च केवळ राम मंदिराच्या उभारणीसाठी येईल. त्याखेरीज या मंदिर संकुल प्रकल्पामध्ये अन्य छोटी मंदिरे व काही इमारतीदेखील उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आणखी वेगळी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

 

Back to top button