अक्षयकुमारच्या जाहिरातीवर नेटिझन्सची आगपाखड | पुढारी

अक्षयकुमारच्या जाहिरातीवर नेटिझन्सची आगपाखड

मुंबई : वृत्तसंस्था : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशात अभिनेता अक्षयकुमारची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यात तो चारचाकीतील एअरबॅगचे महत्त्व विशद करताना दिसत आहे. मात्र, या जाहिरातीमुळे हुंड्यासारख्या प्रथेला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करीत अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सदर जाहिरात ट्विट केली असून, तेही यानिमित्ताने नेटकर्‍यांच्या ‘रडार’वर आले आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या जाहिरातीद्वारे वाहनात 6 एअरबॅग असणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जाहिरातीत वडील आपल्या मुलीला विवाहानंतर निरोप देत असल्याचे द़ृश्य आहे. दोघेही भावुक झालेले असताना तेथे वाहतूक पोलिसाच्या वर्दीतील अक्षयकुमारची एंट्री होते. वधूच्या पित्याला तो म्हणतो की, अशा (दोन एअरबॅग असलेल्या) कारमधून मुलीला निरोप देत आहात, तर डोळ्यांतून अश्रू निघतीलच ना. मुलगी सुरक्षित राहावी असे वाटत असेल, तर सहा एअरबॅग असलेली कार तिला गिफ्ट करा. यानंतर वडील तशी कार मुलीला देतात आणि मुलगी हसत सासरी रवाना होते.

Back to top button