राहुल गांधीच्या झंझावाताने काँग्रेसला नवसंजिवनी | पुढारी

राहुल गांधीच्या झंझावाताने काँग्रेसला नवसंजिवनी

ज्ञानेश्वर बिजले

पुढारी ऑनलाईन डेस्क: कोणी स्वीकारावे अथवा नाकारावे, मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेच विरोधी पक्षाचे मोठे नेते असल्याचे सर्वांना मान्य करावेच लागणार आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर ही साडेतीन हजार किलोमीटरची पाच महिने सुरू राहणारी पदयात्रा काढून राहुल यांनी जबरदस्त चाल रचली आणि काँग्रेसला नवसंजिवनी प्राप्त करून दिली.

भाजपच्या हल्ल्याला तोंड देण्याऐवजी यापुढे काँग्रेसने केलेल्या शाब्दिक हल्ल्याला भाजपला सामोरे जावे लागणार आहे. महागाई, बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांवरच राहुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर दिला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाही त्यांनी केरळमध्ये चर्चेत आणला आहे. सत्ताधारी पक्ष शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करीत असल्याचा सर्वच विरोधकांचा आरोप आहे.

भाजपने दीड वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकले असताना, विरोधकही एकत्र येण्याच्या बैठकांत गुंतले आहेत. अकरा राज्यात विधानसभा निवडणुका वर्षभरात, तर लोकसभा निवडणुकीबरोबर चार राज्यात विधानसभा निवडणूक आहेत. अशा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या वेळी राहुल गांधी यांची दिडशे दिवसांची भारत जोडो यात्रा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरेल, याबाबत फारशी शंका नाही.

काँग्रेसचा अजेंडा, भाजपची फरफट

देशातील राजकीय वातावरण पाहिल्यास, सत्ताधारी भाजप वेगवेगळे विषय काढून लोकांचे लक्ष वेधून घेतो. विरोधक त्याला प्रत्युत्तर देऊ लागताच नवीनच विषय पुढे आणला जातो. त्यात विरोधकांची गोची होते. विरोध पक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना सत्ताधारी उत्तरच देत नाहीत, त्याउलट तेच प्रतिप्रश्न उपस्थित करीत त्याचीच उत्तरे मागत राहतात. या समस्येला सडेतोड उत्तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने दिले आहे. या यात्रेला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

त्यामुळे काँग्रेस अजेंडा सेट करीत आहे, तर भाजपला प्रतिक्रिया द्यावी लागत आहे, हे गेल्या आठवड्याचे चित्र आहे. राहुल गांधी व काँग्रेसजन आता प्रश्न उपस्थित करीत जनतेत पोहोचले आहेत. तर, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांविरुद्ध सोशल मिडीयावरही सडेतोड उत्तरे देण्यात युवा काँग्रेस कार्यकर्ते आणि विरोधक पुढाकार घेत आहेत. पहिल्या पाच दिवसांतच भाजप प्रवक्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. ही यात्रा तर सलग दीडशे दिवस चालू राहणार आहे.

यात्रेचा उद्देश व मार्ग

देशाला एकत्र करा व राष्ट्र बळकट करा, हा उद्देश समोर ठेवून गांधी यांनी ही यात्रा सुरू केली. या विचाराला पाठिंबा असलेल्या सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे देशपातळीवरील कार्यरत अनेक स्वयंसेवी संस्था त्यांना जोडल्या गेल्या. विशेषतः डाव्या व समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते त्यांच्यामागे उभे राहिले. तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाना, पंजाब, जम्मू व काश्मीर या राज्य व केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे.

यात्रेला प्रारंभ

लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाला व त्यांना दहा टक्क्यांपेक्षा कमी जागा मिळाल्या. तरीदेखील दोन्ही वेळा त्यांचे मतदान 19 टक्क्यांच्या आसपास होते. अन्य विरोधी पक्षांच्या तुलनेत ते खूपच अधिक आहे. देशातील अनेक राज्यांत काँग्रेसचे अस्तित्व दिसून आले. भारत जोडो यात्रेचा मार्ग लक्षात घेतल्यास, पक्षाची कमीजास्त प्रमाणात ताकद असलेल्या भागातून ती मार्गस्थ होणार आहे. दक्षिण भारतात मुळातच भाजपची ताकद कर्नाटक वगळता अन्यत्र नगण्य आहे. तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून यात्रा प्रारंभ करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली. तीन दशकांपूर्वी तेथे राजीव गांधीची हत्या झाली होती.

राजस्थान, छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री, तमिळनाडूचे द्रमुकचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यात्रेच्या प्रारंभाला म्हणजेच सात सप्टेंबरला उपस्थित होते. त्याचवेळी त्या त्या राज्यातील नेते, पक्षाचे देशपातळीवरील नेतेही सोबत आहेत. सोशल मिडीयावर त्यांचे व्हिडीओ धुमाकूळ घालत आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह यांनी यात्रेची आखणी केली आहे. शशी थरूर, के. सी. वेणीगोपाळ यात्रेत त्यांच्यासोबत आहेत. जेएनयू विद्यापीठातील आंदोलनातून उदयास आलेला विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार सध्या या यात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचे भाजपवरील थेट हल्ले परतविण्याचा प्रयत्न भाजप सध्यातरी करीत नसल्याचे दिसते. प्रियांका गांधी पुढील आठवड्यात दौऱ्यात सहभागी होत आहेत.

दक्षिण भारतावर लक्ष

काँग्रेसच्या एकूण 53 खासदारांपैकी 23 जण केरळ व तमिळनाडूमधून निवडून आले आहेत. या दोन राज्यात त्यांच्या मित्रपक्षांकडे 34 जागा आहेत. दोन्ही राज्यात विरोधकांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. केरळमध्ये ही यात्रा 19 दिवस आहे. त्याचा फायदा काँग्रेसला संघटना बळकट करण्यासाठी निश्चित होईल. तेथून यात्रा कर्नाटकात प्रवेश करील. 2013 मध्ये कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली.

2014 मध्ये त्यांचे नऊ खासदार निवडून आले होते. 2018 मध्ये काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची आघाडी सत्तेवर आली. मात्र, 2019 मध्ये काँग्रेस व जनता दलाचा प्रत्येकी एकच खासदार निवडून आला. उर्वरीत 26 जागा भाजपला मिळाल्या. पुढे काँग्रेसचे आमदार फोडून भाजपने कर्नाटकातील सत्ता मिळविली. मे 2023 मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणूक आहे. तेथे भाजप व काँग्रेस यांच्यातच टक्कर होईल.

आंध्रप्रदेश व तेलंगणात प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहे. दक्षिण भारतात 130 खासदारांपैकी काँग्रेसचे 28 आणि भाजपचे 29 खासदार म्हणजे जवळपास सारख्या संख्येने आहेत. त्यामुळे भाजपने चलो दक्षिण भारत म्हणत प्रचाराला लागला असला, तरी त्याला तोंड देताना काँग्रेसला पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी या यात्रेचा उपयोग होणार आहे. दक्षिण भारतात महिन्यापेक्षा जास्त कालावधीत काँग्रेसची रोज यात्रा सुरू राहणार आहे. त्याचा निश्चित फायदा काँग्रेसला होईल.

काँग्रेसचा फायदा

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आसपास ही यात्रा मराठवाड्यात प्रवेश करील. नांदेड ते जळगाव जामोद या मार्गावर होणाऱ्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला निश्चितच होईल. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात वर्षभरांनी निवडणुका आहेत. गेल्या वेळी तिन्ही निवडणुका काँग्रेसने जिंकल्यामुळे त्यांना ऊर्जा प्राप्त झाली होती. मात्र, लोकसभेला तिन्ही राज्यात त्यांचा दारूण पराभव झाला. तेथील लोकसभेच्या 65 पैकी भाजपने 62, तर काँग्रेसने तीन जागा मिळविल्या.

या पराभवाने चिडलेल्या राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. नंतर काँग्रेसमधून ज्योतिरादीत्य शिंदे समर्थक आमदारांसह बाहेर पडल्याने मध्य प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर आले. मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये दिवाळीनंतर यात्रा पोहोचेल. तेथे काँग्रेसची चांगली ताकद असल्याने, त्यांना यात्रेचा निश्चित फायदा होईल. याच कालखंडात गुजरात व हिमाचल प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुका आहेत. उत्तरप्रदेशातील बुंदेलखंड भागातून यात्रा गेल्यानंतर ती दिल्ली, हरियाणा, पंजाबमधून मार्गस्थ होईल. यात्रेचा बहुतेक मार्ग काँग्रेसची थोडीफार ताकद शिल्लक असलेल्या भागातून जात असल्याने काँग्रेसला त्याचा फायदा होणार आहे.

उत्तर भारतात घमासान

भाजपची खरी ताकद आहे ती उत्तर भारतात. या भागातील खासदारांच्या जोरावरच भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल झाली. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये 120 खासदार आहेत. तेथे काँग्रेसचे केवळ दोन खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने या भागातील चौघांना अन्य राज्यांतून नुकतेच राज्यसभेवर पाठविले. उत्तरप्रदेशातील एक-दोन दिवस वगळता या दोन्ही राज्यात राहुल गांधींची यात्रा जाणार नाही.

बिहारमध्ये नुकतेच रणकंदन झाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांच्यासह सात विरोधी पक्षांची आघाडी करीत सत्ता पलटविली. नितीशकुमार यांच्यासोबत तेजस्वी यादव व अखिलेश यादव अशी आघाडी होत असल्याने भाजपला या दोन्ही राज्यातील जागा राखण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागतील. नितीशकुमार अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही संवाद साधत आहेत.

दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब सर केल्यानंतर आता गुजरात व हिमाचल प्रदेशवर लक्ष केंद्रीत केले आहे. पश्चिम बंगालची विधानसभा जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी या देशपातळीवर नेतृत्व करण्यासाठी सरसावल्या आहेत. त्या पूर्व भारतात भाजपला जेरीस आणतील. उत्तर भारतातील प्रत्येक राज्यात भाजपला वेगवेगळ्या पक्षांशी लढावे लागेल. मुळात भाजपच्या जागा अधिक असल्याने, त्यांना जागा वाढविण्यासाठी फारशी संधी नाही. असलेले खासदार पुन्हा निवडून आणण्यासाठीच त्यांना अधिक परीश्रम करावे लागतील.

पंतप्रधान कोण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशपातळीवर आव्हान देणारा नेता सध्यातरी दिसून येत नाही. मात्र, पंतप्रधान बनण्याची इच्छा असलेले प्रादेशिक नेते निवडणूक ताकदीने लढवतील. राज्याचा नेता पंतप्रधान होऊ शकतो, या प्रचाराचा फायदा जसा भाजपला गुजरातमध्ये होतो, तसाच फायदा या प्रादेशिक नेत्यांना त्यांच्या राज्यात होऊ शकतो. काँग्रेसने गेल्या दोन निवडणुकीतील मतांची टक्केवारी दोन-तीनने जरी वाढविली, तरी ते शंभर जागांपर्यंत पोहोचण्याची आशा आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या पदयात्रेकडे पाहिले पाहिजे.

राहुल गांधींची वाटचाल

राहुल गांधी 2004 पासून चारवेळा लोकसभेवर निवडून गेले. 2019 च्या लोकसभेतील पराभवानंतर पक्षाध्यक्ष पद त्यांनी सोडले. या पदासाठी पुढील महिन्यांत निवडणूक होत आहे. पक्षातील नेत्यांची इच्छा राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे अशी असली, तरी राहुल त्या पदासाठी इच्छुक नाहीत. नवीनच अध्यक्ष निवडला गेल्यास त्यांच्यावरील घराणेशाहीचा आरोप आपोआपच संपून जातो. राहुल यांनी कधीही केंद्रात मंत्री पद घेतलेले नाही.

त्यांच्याविरोधात सोशल माध्यमांवर मोठी मोहीम चालविण्यात आली. मात्र, त्याला उत्तर देण्याऐवजी ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलण्यावरच भर देतात. पक्षातील जी 23 गटाने पत्र पाठवित हल्ला केला. भाजपने जसे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मंडळात पाठविले. तीच पद्धत काँग्रेसने ही अवलंबिली. गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, कपील सिब्बल यांना राज्यसभेची उमेदवारी पुन्हा मिळाली नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांना बदलले. त्यामुळे यापुढील काँग्रेसची सुत्रे ही राहुल गांधी यांच्याकडेच राहणार आहेत. बहुतेक नेते पक्ष सोडत आहेत.

प्रियांका गांधी, कन्हैयाकुमार, जिग्नेश मेवानी हे राहुल गांधींसोबत आहेत. राहुल गांधी यांचे वैशिष्ठ्य म्हणजे थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे आणि स्वतःसाठी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवणे. सर्वसामान्य जनतेत मिसळत ते भारत जोडो यात्रा काढीत आहेत. त्यामुळे असंख्य गावे पादाक्रांत करीत असतानाच लाखो मतदारांशी ते थेट संपर्क साधणार आहे. त्यांची ही झंझावाती यात्रा निश्चितच काँग्रेसला नवसंजीवनी बहाल करणार आहे.

Back to top button